Donald Softens Stance On India: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार तणाव निर्माण झाला आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो म्हणून रशियन युद्धयंत्रणेला युक्रेनविरोधात युद्ध करण्यासाठी आर्थिक मदत होते, असा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. याचबरोबर भारत अमेरिकन उत्पादनांवर सर्वाधिक टॅरिफ लादतो, असे म्हणत ट्रम्प यांनी भारताचे वर्णन ‘टॅरिफचा महाराजा’ असे केले आहे.

ट्रम्प यांची सलोख्याची भाषा

इतकेच नव्हे, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील अधिकारीही सातत्याने भारतविरोधी विधाने करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीही काल रशियन तेल खरेदी करणाऱ्या भारतावर १०० टक्के टॅरिफ लादा, असे म्हटले होते. पण अशात आता ट्रम्प यांचा भारताबाबतचा सूर बदलला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कारण भारतविरोधात कठोर उपाययोजना करण्याची धमकी देणारे ट्रम्प आता सलोख्याची भाषा करत आहेत.

आर्थिक तणावाची चिन्हे

दरम्यान, टॅरिफ विरोधात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी सौम्य भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांचे भारतविरोधी सूर नरमले असल्याचे दिसत आहे. कारण जर सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला, तर अमेरिकन ट्रेझरी विभागाला ७५० अब्ज डॉलर्स ते १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वसूल केलेल्या टॅरिफची परतफेड करावी लागू शकते. कायदेशीर दबाव आणि आर्थिक तणावाची चिन्हे दिसत असल्याने ट्रम्प पुन्हा एकदा आपले मत बदलत असल्याचे दिसून येत आहे.

भारतावर ५० टक्के टॅरिफ लादत, भारत व्यापाराचा गैरवापर करणारा देश असल्याची टीका केल्यानंतर, ट्रम्प आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा “प्रिय मित्र” म्हणून उल्लेख करत आहेत. तसेच दोन्ही देशांतील व्यापार कराराबाबत आशावादी विधाने करत आहेत.

मोदी खूप चांगले मित्र

डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यात त्यांनी पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र राहतील, असे म्हटले होते. त्यानंतर आज पहाटे केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी भारत-अमेरिकेदरम्यानची व्यापार चर्चा पुन्हा सुरू होईल, असे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ट्रुथ सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी बोलण्यासाठी मी उत्सुक असून पुढील आठवड्यात आमची चर्चा होईल.