मसूदप्रकरणी भारताचे चीनला जशास तसे उत्तर
जैश-ए-मोहमम्द या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खो घालणाऱ्या चीनला भारताने जशास तसे उत्तर दिले आहे. चीनच्या मुस्लीमबहुल वीगर (युघूर) प्रांतातील फुटीरतावादी नेता डोल्कन इसा याला एका परिषदेला हजर राहण्यासाठी भारताने व्हिसा दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधात नव्याने तणाव निर्माण झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या उत्तरेला असलेल्या चीनमधील सिक्यांग (झिनजिअँग) आणि वीघर (युघूर) प्रांतांमध्ये चीनच्या शासनाविरोधात फुटीर चळवळी सुरू आहेत. त्यापैकी वर्ल्ड युघूर काँग्रेस (डब्लूयूसी) या संघटनेचा नेता डोल्कन इसा याला चीनने दहशतवादी ठरवून त्याच्याविरुद्ध इंटरपोलतर्फे रेड कॉर्नर नोटीस जारी करवून घेतली आहे. इसा सध्या जर्मनीत वास्तव्यास आहे. अमेरिकेतील ‘इनिशिएटिव्हज फॉर चायना’ या संस्थेने पुढील आठवडय़ात हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे आयोजित केलेल्या स्वातंत्र्यविषयक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारताने इसाला आमंत्रित केले आहे. या परिषदेत चीनमधून परागंदा व्हावे लागलेले अनेक लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्यकांक्षी नेते उपस्थित राहून स्वातंत्र्य चळवळींविषयी विचारविनिमय करणार आहेत. चीनमधील फुटीर तिबेट प्रांतांचे नेते दलाई लामा यांचे आश्रयस्थान असलेल्या धरमशाला येथे ही परिषद भरवून भारताने चीनच्या दुखत्या शीरेवर बोट ठेवले आहे.
डोल्कनवर इंटरपोल आणि चीनच्या पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्याचा न्यायनिवाडा करून शासन करणे ही संबंधित देशांची जबाबदारी आहे, असे म्हणत चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने नाराजी व्यक्त केली. यावर भारताच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटले की, या संदर्भातील प्रसारमाध्यमांतील वृत्ते परराष्ट्र खात्याने पाहिली असून त्या बाबतीत सत्य पडताळून पाहिले जात आहे. डोल्कन याने प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने त्याला यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक व्हिसा जारी केला आहे. मात्र भारतात त्याच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांची खात्री पटल्यानंतरच तो भारतात येण्याचा निर्णय घेईल.  यामुळे भारत-चीन यांच्यातील मसूद अझर प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.