अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या भारतीय पुरुष संघ तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करतच आज विश्वविजेत्या बेल्जियमविरोधात मैदानात उतरला. आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत आहे. रविवारी भारताने ब्रिटनला ३-१ असे नमवून उपांत्य फेरी गाठली आणि आता भारत पदकापासून एका विजयाच्या अंतरावर आहे, याची प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना खात्री असून आजच्या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा हा सामना पाहत असल्याचं त्यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी सात वाजता सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या हाफनंतर दोन्ही संघ २-२ च्या बरोबरीत असतानाच मोदींनी पहिल्या क्वार्टरनंतर सात वाजून ३७ मिनिटांनी एक ट्विट केलं. यामध्ये मोदींनी, “मी भारत विरुद्ध बेल्जियमदरम्यानचा पुरुष हॉकीचा उपांत्य फेरीचा सामना पाहत आहे. मला आपल्या संघाचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

१९८० च्या ऑलिम्पिकमधील भारताने अखेरचे सुवर्णपदक ब्रिटनला ३-१ अशा फरकाने हरवून प्राप्त केले होते. पण त्यावेळी उपांत्य फेरीचा सामना नव्हता. १९७२ मधील म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा पाकिस्तानकडून भारताने ०-२ अशी हार पत्करली होती. दुसऱ्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून १-७ असा पराभव पत्करल्यानंतर भारताने सलग चार सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवत आजच्या ऐतिहासिक सामन्यात प्रवेश केलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs belgium men hockey semifinal i am watching the match says pm modi scsg
First published on: 03-08-2021 at 08:22 IST