India welcomes Israel-Iran ceasefire : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचे शस्त्रविरामावर एकमत झाल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर काही तासांनी भारताने या शस्त्रविरामाचे स्वागत केले आहे. “या भागातील अनेक संघर्ष मांडण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी संवाद (Dialogue) आणि मुत्सद्देगिरी (Diplomacy) यांना पर्याय नाही,” असेही भारताने म्हटले आहे.
शस्त्रविराम जाहीर झाल्याने भारतीय दूतावासाने भारतीयांना या देशाबाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात सुरू केलेले मशहाद येथील कार्यालय बंद केले आहे. “शस्त्रविरामाच्या घोषणेमुळे इराणमधील मशहाद येथील हॉटेल सद्रमधील भारतीय दूतावासाचा कॉन्टॅक्ट डेस्क यापुढे बंद करण्यात येत आहे,” अशी माहिती देण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षासंबंधित घडामोडींवर रात्रभर लक्ष ठेवून आहोत, ज्यामध्ये अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवर केलेले हेल्ले आणि इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या कतारमधील लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांचा समावेश आहे.”
“या संपूर्ण घडामोडीनंतर भविष्याबद्दल तसेच एकंदरीत प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेबद्दल आम्ही गंभीर चिंतेत आहोत, आम्ही इराण आणि इस्त्रायल यांच्यात शस्रविराम झाल्याच्या वृत्ताचे आणि ते घडवून आणण्यात अमेरिका आणि कतार यांच्या भूमिकेचे स्वागत करतो,” असेही निवेदनात म्हटले आहे.
“आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की या प्रदेशातील अनेक संघर्ष मांडण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी यांना पर्याय नाही,” असे त्यात म्हटले आहे.
दरम्यान इराण आणि इस्त्रायल संघर्षादरम्यान भारत इस्रायल आणि इराणच्या संपर्कात राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली आहे.