भारतीय वंशाचे खासदार सुहास सुब्रमण्यम यांनी अमेरिकेतील हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत आणि तोडफोडीबाबत निषेध नोंदवला आहे. अमेरिकेत धार्मिक समुदाय आणि तिरस्कार निर्माण करणारे लोक आणि त्यांची कृती निषेधार्ह आहे असंही सुहास सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे. इंडियाना येथील श्री स्वामीनारायण मंदिर आणि यूटा येथील श्री राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी झालेल्या तोडफोडीचं उदाहरण त्यांनी दिलं.
सुहास सुब्रमण्यम नेमकं काय म्हणाले?
सुहास सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे की अमेरिकेतील हिंदू मंदिरांची, धार्मिक स्थळांची तोडफोड करुन त्या ठिकाणी हिंसेचं प्रदर्शन करणं ही बाब निश्चित निषेधार्ह आहे. लोकांना एकमेकांपासून विभाजित करण्याची वृत्ती अशा विशिष्ट प्रवृत्तींमध्ये आढळून येते आहे. कॅपिटल हिल या ठिकाणी सभागृहात बोलत असताना त्यांनी आपल्या भाषणात ही उदाहरणं दिली आणि या घटनांचा निषेध नोंदवला. तसंच हे अनेक ठिकाणी घडतं आहे ही बाब चुकीची आहे असंही सुब्रमण्यम म्हणाले.
वर्षभरात मंदिर तोडफोडीच्या अमेरिकेत चार घटना
आपल्या भाषणात ते म्हणाले ऑगस्ट महिन्यात ग्रीनवुड या ठिकाणी स्वामी नारायण मंदिर फोडण्यात आलं. मागील वर्षभरातली अमेरिकेतलं हिंदू मंदिर तोडफोडीची ही चौथी घटना होती. या घटनेचा निषेध स्वामी नारायण मंदिरानेही नोंदवला.तसंच जुलै महिन्यात युटा येथील राधाकृष्ण मंदिर या ठिकाणीही तोडफोड करण्यात आली. याचाही निषेध करावा तेवढा कमी आहे. इस्कॉनच्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी हा हल्ला झाला आणि मंदिर, मंदिराची इमारत आणि इतर मालमत्तेवर २० ते ३० गोळ्या झाडण्यात आल्या. त्यावेळी अनेक भाविक आणि पाहुणे मंदिरात उपस्थित होते. या घटनेत हजारो डॉलर्सचं नुकसान झालं. मंदिरातील नक्षीकामही उद्ध्वस्त झालं. हे उदाहरणही सुब्रमण्यम यांनी दिलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
अशा घटना रोखायच्या असतील तर आपल्यालाच…
दरम्यान सुहास सुब्रमण्यम म्हणाले, अशा प्रकारच्या घटना रोखायच्या असतील तर धार्मिक संस्थांचा सुरक्षा निधी हा आपल्याला वाढवावा लागेल. तिरस्काराला तिलांजली द्यावी लागेल. आपण सगळ्या भारतीय वंशाच्या अमेरिकेन नागरिकांनी अजिबात न डगमगून जाता आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे असंही सुहास सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे. आपल्या मंदिरांचं, धार्मिक वास्तूंचं जतन व्हावं यासाठी आता आपल्यालाच पावलं उचलावी लागतील असंही सुब्रमण्यम म्हणाले.
कोण आहेत सुहास सुब्रमण्यम?
सुहास सुब्रमण्यम हे भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार आहेत. तसंच ते एक उत्तम वकीलही आहेत. सुहास सुब्रमण्यम हे बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना व्हाईट हाऊसचे सल्लागार होते. २०१९ मध्ये त्यांना व्हर्जिनिया येथील खासदार म्हणून निवडलं गेलं.