अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेत भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे. कश्यप  पटेल हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांची व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) दहशतवादविरोधी पथकाच्या ज्येष्ठ संचालक पदी बढती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इंटेलिजन्स कमिटीचे ते माजी कर्मचारी आहेत. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इंटेलिजन्सचे पद सोडले होते.

सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबींमध्ये समन्वय साधण्यासाठी एनएससी निर्माण करण्यात आली आहे. एनएससीचे प्रमुखपद हे अमेरिकेचे अध्यक्ष भूषवतात. सध्या एनएससीचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा समितीचे  सल्लागार जॉन बोल्टन करीत आहेत. पटेल हे दहशतवादविरोधी विभागात  वकील म्हणून कार्यरत होते.

कश्यप पटेल यांनी अमेरिकेच्या इंटेलिजेंस ब्युरो संदर्भात एक मेमो तयार केला होता. त्यात त्यांनी ट्रम्प यांची प्रचार मोहिम आणि रशियन सरकार यांच्यातील कथित संबंधांच्या एफबीआय चौकशीत अनियमितता असल्याचे म्हटले  होते. फेडरल कोर्टात काम करताना टाय न घातल्यामुळे पटेल हे पहिल्यांदा चर्चेत आले होते.