व्हॉर्टन इंडिया इकोनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बीजभाषणासाठी बोलावण्याचा निर्णय फोरमच्या संचालकांनी मागे घेतला. पेनसिल्व्हानिया विद्यापीठातीत भारतीय वंशाच्या तीन प्राध्यापकांनी फोरमच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला आणि निर्णय मागे घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली. त्यामुळेच मोदींना बोलावण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मोदी यांना परिषदेसाठी देण्यात आलेले निमंत्रण मागे घेण्यात आल्यामुळे शिवसेनेचे नेते सुरेश प्रभू यांनीदेखील या परिषदेला न जाण्याचा निर्णय घेतला.
येत्या २३ मार्च रोजी व्हॉर्टनची वार्षिक परिषद होणार आहे. परिषदेत विचार मांडणाऱया मान्यवर वक्त्यांमध्ये मोदी यांचाही समावेश करण्यात आला होता. ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बीजभाषण करणार होते. मात्र, त्यांना निमंत्रित करण्याचा निर्णयाला प्राध्यापकांनी विरोध केल्यामुळे अखेर हा निर्णय रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे व्हॉर्टन बिझनेस स्कूलमधील एकाही प्राध्यापकाने मोदी यांना विरोध करणाऱया निवेदनावर स्वाक्षरी केलेली नाही.
सुरुवातीला मोदींना विरोध करणाऱया निवेदनावर १३५ प्राध्यापकांनी स्वाक्षरी केली होती. रविवारी तो आकडा २५० पर्यंत पोहोचल्याची माहिती मोहिमेतील एका प्राध्यापकाने दिली. मोदी यांना निमंत्रित करण्याचा निर्णय रद्द करण्याचे या प्राध्यापकांनी स्वागत केले. फोरमच्या संचालकांवर आम्ही दबाव टाकल्यामुळेच हा निर्णय रद्द करण्यात आला. आम्हाला व्हॉर्टन स्कूल आणि पेनसिल्व्हानिया विद्यापीठाचा अभिमान वाटतो. तरीही मोदींना बोलावलेच कसे, याचे आम्हाला आश्चर्य वाटते, असे तूर्जो घोष यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. घोष यांनीच मोदी यांना निमंत्रित करण्याला विरोध दर्शविला होता.