अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका महिलेने तिच्या पतीस पेटवून ठार मारल्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात तिला दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र यात तिला मनुष्यवधासाठी दोषी ठरवलेले नाही.
२७ वर्षांच्या श्रीया पटेल हिने तिच्या पतीला पेटवून दिल्याच्या प्रकरणाचा खटला द ट्रव्हिस काउंटी येथे चालला व त्यात तिला पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. न्यायाधीश डेव्हिड क्रेन यांनी नंतर साक्षीपुराव्यांची तपासणी करणाऱ्या या प्रकरणातील ज्युरींना निलंबित केले. शिक्षा सुनावण्याच्या टप्प्यातच त्यांनी ही कारवाई केली. श्रीया हिला आता पाच ते ८९ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. फिर्यादी पक्षाने श्रीयावर असा आरोप केला होता की, तिने तिचा पती बिमल पटेल (२९) याला मसाजसाठी बाथटबमध्ये आणले व त्याच्यावर गॅसोलिन ओतून १७ एप्रिल २०१२ रोजी पेटवून दिले. बिमलचा त्यानंतर पाच महिन्यांनी सॅन अँटानियो लष्करी वैद्यकीय केंद्रात मृत्यू झाला.
बचाव पक्षाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, बिमलने स्वत:च पेटवून घेतले व नंतर श्रीयाला मदतीसाठी बोलावले होते. शुक्रवारी याबाबतचे साक्षीपुरावे संपत असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी टेक्सास विद्यापीठातील भारतीय संस्कृती विषयाच्या सहायक प्राध्यापकास साक्षीसाठी बोलावले. या साक्षीदार महिलेने ज्युरींना असे सांगितले की, भारतात विवाह ठरवून केले जातात. मुलींना यशस्वी व धनवान पुरुषांशी विवाह करण्यास प्रवृत्त केले जाते. बचाव पक्षाने बिमलच्या नाकात कोंबलेले कापसाचे बोळे सादर केले. फिर्यादी पक्षाने सांगितले की, श्रीया ही  समाधानी नव्हती. ती अमेरिकेला आली तेव्हा बिमल हा तिला वाटत होते तसा श्रीमंत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने तिने हे कृत्य केले.