लष्कराला मिळणार अत्याधुनिक ‘अर्जुन एमके-१ ए’ रणगाडे

अर्जुन रणगाड्यात ७२ बदल सुचवत  ‘अर्जुन एमके-१ ए’ ही नवी आवृत्ती ‘डीआरडीओ’ने विकसित केली,  ११८ रणगाडे चैन्नई स्थित ‘हेवी व्हेहिकल फॅक्टरी’मध्ये बनवणार

Arjun-Mk1A Battle Tank

भारताच्या लष्कराला स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्याची नवी आवृत्ती मिळणार आहे. संरक्षण दलाने ११८ ‘अर्जुन एमके-१ ए’ रणगाड्यांची ऑर्डर चेन्नई स्थित आयुध निर्माण कारखान्याच्या ‘हेवी व्हेहिकल फॅक्टरी’ला दिली आहे. यामुळे पुढील काही महिन्यांत संरक्षण दलात अत्याधुनिक अर्जुन एमके-१ ए रणगाडे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ११८ रणगाड्यांची किंमत ही ७ हजार ५२३ कोटी रुपये एवढी आहे. 

डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने बऱ्याच वर्षांच्या संशोधनानंतर स्वदेशी बनावटीचा अर्जुन रणगाडा ( अर्जुन एमके- १ ) विकसित केला होता. मात्र संरक्षण दलाने यात अनेक बदल सुचवले. २०१२ पर्यंत एकुण १२४ अर्जुन रणगाडे हे लष्करात दाखल झाले. असं असलं तरी बदलत्या काळानुसार आणि संरक्षण दलाची नवी गरज लक्षात घेता अर्जुन रणगाड्यामध्ये आणखी बदल संरक्षण दलाने सुचवले. 

तेव्हा अर्जुन एमके- १ रणगाड्यात आणखी ७२ बदल करत अर्जुन रणगाड्याची नवी आवृत्ती ‘अर्जुन एमके-१ ए’ ही डीआरडीओने विकसित केली. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान यांच्या हस्ते पहिला अर्जुन एमके-१ ए रणगाडा लष्कराकडे दिला होता. लष्कराने विविध ठिकाणी सखोल चाचण्यानंतर अर्जुन एमके-१ ए रणगाड्याला स्वीकारले आणि ११८ रणगाड्यांची ऑर्डर दिली.

अर्जुन एमके-१ ए ची वैशिष्ट्ये काय ?

अर्जुन एमके-१ ए रणगाड्याचे वजन तब्बल ६८ टन एवढे आहे. जगातील सर्वात वजनदार रणगाडा म्हणून अर्जुन एमके-१ ए रणगाडा ओळखला जात आहे. असं असलं तरी भारतातील सर्व प्रकारच्या प्रदेशात जास्तीत जास्त ५८ किलोमीटर प्रति तास या वेगाने संचार करण्याची क्षमता या रणगाड्याने सिद्ध केली आहे. १२० मिलीमीटर तोफेतून वेगाने तोफगोळे डागण्याची या रणगाड्याची क्षमता उच्च प्रतिची आहे. दिवस असो वा रात्र किंवा कोणताही ऋ्तु, कोणत्यााही परिस्थितीत रणभुमिवर टिकाव धरु शकेल अशी या रणगाड्याची अचाट अशी क्षमता असल्याचा दावा डीआरडीओने केला आहे.

११८ रणगाड्यांच्या निर्मितीमुळे उद्योग क्षेत्रात ८००० जणांना रोजगार मिळेल असा विश्वास डीआरडीओने व्यक्त केला आहे. अर्जुन एमके-१ए रणगाड्याचा समावेश जरी होणार असला तरी ही संख्या लष्कराकडे असलेल्या एकुण रणगाड्यांच्या संख्येच्या तुलनेत नगण्य अशी आहे. लष्कराने अजुनही पुर्णपणे अर्जुनसारख्या स्वदेशी बनावटीच्या रणगाड्यांवर विश्वास दाखवलेला नाही. लष्कराची भिस्त आजही रशियाचे तंत्रज्ञान असलेल्या टी-९० सारख्या रणगाड्यांवर आहे. तेव्हा येत्या काळांत स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान असलेले आणखी अत्याधुनिक रणगाडे डीआरडीओ कधीपर्यंत विकसित करतात हे बघणे उत्सुकतेचे असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian army placed order for arjun mk 1 battle tank asj82

ताज्या बातम्या