पाकिस्तानच्या तावडीतून मायदेशी परतलेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांचे कोर्ट मार्शल करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांना २ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून दंड म्हणून त्यांची दोन वर्षांची पेन्शनही बंद करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर २९ सप्टेंबररोजी ‘३७ राष्ट्रीय रायफल्स’ मधील जवान चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकच्या हद्दीत प्रवेश केला होता. पाक सैन्याने चंदू चव्हाण यांना अटक केली होती. तब्बल चार महिने चंदू चव्हाण पाकिस्तानच्या तावडीत होते. पाकिस्तान सरकारने २१ जानेवारी रोजी चंदू चव्हाण यांना भारत सरकारच्या स्वाधीन केले.
चंदू चव्हाण नजरचुकीने पाकमध्ये गेल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र वरिष्ठांशी झालेल्या मतभेदांतून रागाच्या भरात चंदूने सीमा ओलांडल्याचे वृत्तही समोर आले. याप्रकरणी भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांनी चंदू चव्हाण यांच्या चौकशीला सुरुवात केली होती.

सीएनएन- न्यूज १८ या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराच्या चौकशीत चंदू यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये पळून गेल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी चंदू चव्हाण यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लष्करी न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात चंदू चव्हाणला वरिष्ठ न्यायालयात अपील करता येणार आहे. चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये का गेले, हे मात्र अद्यापही समजू शकलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंदू चव्हाण हा धुळे जिल्ह्यातील बोरविहिरचा रहिवासी आहे. चंदू चव्हाणच्या सुटकेनंतर गावात जल्लोष करण्यात आला होता. गावी परतल्यावर चंदूचे जंगी स्वागतही करण्यात आले होते. केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी वाघा बॉर्डर येथे जाऊन चंदू यांचे स्वागत केले होते. ‘पाकिस्तानच्या ताब्यात असताना मला अमानूष मारहाण करण्यात आली होती’, असे चंदू चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.