पीटीआय, जेरुसलेम
इस्रायलवर ‘हमास’ने चढवलेल्या हल्ल्यानंतर अद्याप गाझा पट्टी आणि इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. त्यांच्या संदर्भात सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. मात्र, या संघर्षांमुळे इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी तेल अवीवमधील भारतीय दूतावासाला त्यांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी विनंती केली आहे. सुमारे १८ हजार भारतीय नागरिक इस्रायलमध्ये राहतात. सुदैवाने आतापर्यंत त्यांच्याशी संबंधित कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ‘हमास’च्या हल्ल्यात सैनिकांसह किमान ६०० इस्रायली नागरिक मृत्युमुखी पडले आणि एक हजार ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. हा गेल्या ५० वर्षांतील इस्रायलवरील सर्वात भीषण हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये सुमारे ३०० जण ठार झाले आहेत आणि सुमारे एक हजार ५०० जण जखमी झाले आहेत.
देशात अडकलेल्या भारतीय पर्यटकांनी त्यांचे स्थलांतर करण्याची भारतीय दूतावासाकडे विनंती केली आहे. बहुतांश पर्यटक गटा-गटाने प्रवास करत आहेत. यात इस्रायलला भेट देणारे काही व्यावसायिकही आहेत जे तणावाखाली आहेत आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेल अवीवमधील भारतीय दूतावास आणि पॅलेस्टाइनमधील भारताच्या प्रतिनिधी कार्यालयाने शनिवारी भारतीय नागरिकांना या आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याचे आणि प्रसंगी कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा >>>संघर्ष पेटला! इस्रायल आणि हमासमध्ये १ हजारांहून नागरिकांचा मृत्यू; गाझा पट्टीत हवाई हल्ले चालूच
दूतावासाकडून वृत्तसंस्थेस सांगण्यात आले, की आम्ही सर्व भारतीय नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध आहोत आणि ‘हेल्पलाइन’द्वारे त्यांना सातत्याने मार्गदर्शन करत आहोत. इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांपैकी बहुसंख्य देखभालीच्या स्वरूपातील काम करतात. परंतु तेथे सुमारे एक हजार विद्यार्थी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) अनेक व्यावसायिक आणि हिरे व्यापारी आहेत. हिब्रू विद्यापीठात डॉक्टरेट करत असलेली विद्यार्थिनी बिंदूने सांगितले की, तिने शनिवारी दिवसभर दूतावासाच्या सूचनांचे पालन केल्याने तिला सुरक्षित वाटले. सर्व भारतीय विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आहेत.
हेही वाचा >>>इस्रायल-पॅलेस्टाईन पार्श्वभूमीवर शाहरुख खानचं ‘ते’ जुनं ट्वीट होतंय व्हायरल; नेटकरी म्हणाले “गद्दार…”
इजिप्तमध्ये इस्रायली पर्यटकांवर गोळीबार
इजिप्तच्या अलेक्झांड्रिया शहरात एका पोलिसाने इस्रायली पर्यटकांवर रविवारी केलेल्या गोळीबारात किमान दोन इस्रायली व एक इजिप्शियन असे तीन जण ठार झाले. अलेक्झांड्रियातील पोम्पेज पिलर या स्थळावर झालेल्या या हल्ल्यात एक जण जखमी झाला, असे इजिप्तच्या गृहमंत्रालयाने एका निवेदनात सांगितले. मात्र त्यांनी आणखी तपशील दिले नाहीत. किरकोळ जखमी झालेली व्यक्ती इस्रायली असल्याचे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. इस्रायली लोकांना मायदेशी परत आणण्यासाठी आपण इजिप्शियन सरकारच्या संपर्कात असल्याचेही त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
नुसरत भरूचा इस्रायलमधून सुखरूप मायदेशी
हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इस्रायलला गेलेली हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नुसरत भरूचा रविवारी दुपारी मायदेशी परतली. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्याने तिथे युद्धजन्य परिस्थती निर्माण झाली आहे. अशा वेळी नुसरत या देशात अडकली होती. मात्र ती आता सुखरूप भारतात परतली आहे. दुपारी २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ती बाहेर पडली. मुंबईत परतल्यावर भावूक झालेल्या नुसरतने ‘मला थोडा वेळ द्या’ असे माध्यमकर्मीना सांगितले.