लोकसभा निवडणुकीतील पाच टप्प्यांमधील मतदान झाले असून पाकिस्तानमधील भारतीय दुतावासातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतरचा फोटो ट्विट केला आहे.

पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी मतदानाचा फोटो ट्विट केला आहे. यात ते म्हणतात, मी मतदानाचा हक्क बजावला. इलेक्ट्रॉनिक पोस्टल व्होटिंगद्वारे मी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाचे आभार.

यानंतर भारताच्या उच्चायुक्तानेही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मतदानानंतरचा फोटो ट्विट केला आहे. अजय बिसारिया आणि त्यांच्या टीमनेही लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभाग घेतला, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पाच टप्प्यांमधील मतदान झाले आहे. आता सहावा आणि सातव्या टप्प्यातील मतदान १२ आणि १९ मे रोजी होणार आहे.