सेल्फी घेण्याच्या नादात अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील येसेमिटी नॅशनल पार्कच्या टाफ्ट पॉइंट येथून ८०० फूट खोल दरीत कोसळून ‘त्या’ भारतीय दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा, असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विष्णू विश्वनाथ (वय २९) आणि त्यांची पत्नी मीनाक्षी मूर्थी (वय ३०) हे दोघे काही आठवड्यांपूर्वी कॅलिफोर्नियाच्या योसेमिटी नॅशनल पार्कमधील प्रसिद्ध टाफ्ट पॉइंट या दुर्गम पहाडी भागात पर्यटनासाठी गेले होते. या दोघांना फिरण्याची आवड होती आपल्या प्रवासावर ते ‘हॉलिडेज अॅण्ड हॅपिली अवर आफ्टर्स’ नावाने ब्लॉगही लिहीत होते.

या ब्लॉगमधील काही छायाचित्रांवरुन ते अतिशय धोकादायक ठिकाणांवरुन सेल्फी घेत असल्याचेही स्पष्ट होत आहे. या दाम्पत्याचा ८०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू होण्यापूर्वी ते सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत होते असे, विष्णूचा भाऊ जिष्णू विश्वनाथ याने सांगितले आहे. फॉक्स न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. मात्र, यावर अद्याप स्थानिक तपास यंत्रणांनी कुठलीही अधिकृत भुमिका स्पष्ट केलेली नाही.

गेल्या गुरुवारी इथल्या लष्कराच्या जवानांना या पहाडी भागातून या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. यावेळी घटनास्थळी त्यांचा कॅमेरा ट्रायपॉडवर लावलेला आढळून आला होता मात्र त्याच्याजवळ कोणीही नव्हते, असे काही पर्यटकांचे म्हणणे आहे. त्यानंतर अखेर सोमवारी हे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

या दोघांनी २००६ मध्ये चेंगान्नूर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरींग केले आहे. दोघांनाही फिरण्याचा छंद होता. त्यासाठी आपल्या फिरस्तीवर ते सातत्याने ब्लॉगही लिहीत होते. या दोघांचा हा ब्लॉग पाहिल्यानंतर त्यात जगभरातील त्यांचे प्रवासाचे विविध अनुभव लिहीलेले पहायला मिळतात. दरम्यान, हे दोघे दरीत कसे काय पडले ही घटना घडली त्यावेळी ते दोघे तिथे काय करीत होते, याचा शोध स्थानिक पोलीस प्रशासन घेत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian couple who died in yosemite national park may have been taking a selfie says report
First published on: 31-10-2018 at 16:01 IST