नवी दिल्ली : निवडणूक आयोग पुढील आठवडय़ांपासून देशव्यापी मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीचा (एसआयआर) पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे. पुढील वर्षांत निवडणूक होणाऱ्या राज्यांसह १० ते १५ राज्यांपासून या टप्प्याला सुरुवात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
आसाम, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील विधानसभा निवडणुका २०२६च्या सुरुवातीला होणार आहेत. या राज्यांचाही पहिल्या टप्प्यात समावेश असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत किंवा लवकरच होणार आहेत अशा राज्यांमध्ये ‘एसआयआर’ला सुरुवात होणार नाही. त्या राज्यांमधील तळागाळातील निवडणूक यंत्रणा स्थानिक निवडणुकांमध्ये व्यग्र असेल आणि त्यांना ‘एसआयआर’वर लक्ष केंद्रित करता येणार नाही, या कारणामुळे अशा राज्यांमध्ये नंतरच्या टप्प्यांमध्ये ‘एसआयआर’ राबवले जाईल.
निवडणूक आयोगाने या मुद्दय़ावर आतापर्यंत राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या दोन परिषदा घेतल्या आहेत.
मद्रास उच्च न्यायालयालाही माहिती
चेन्नई : तमिळनाडूतील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) पुढील आठवडय़ात सुरू होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयालाही दिली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मणींद्र मोहन श्रीवास्तव आणि न्या. जी अरुल मुरुगन यांच्या खंडपीठासमोर आयोगाने शुक्रवारी यासंबंधीचे निवेदन सादर केले. एसआयआर मोहिमेदरम्यान, याचिकाकर्ते आणि अण्णाद्रमुकचे माजी आमदार बी सत्यनारायणन यांनी उपस्थित केलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जातील, असे आयोगाने न्यायालयाला सांगितले.
