पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशात संतापाची लाट असताना आता केंद्र सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेणाऱ्या भारत सरकारने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. पाकिस्तानला जाणारे पाणी आता भारत स्वत:साठी वापरणार आहे. पूर्वेकडच्या नद्यांचे पाणी आता जम्मू-काश्मीर आणि पंजाबसाठी वापरणार आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने पाकिस्तानात वाहून जाणारं पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वेकडील नद्यांचं पाणी वळवून त्याचा वापर जम्मू-काश्मीर आणि पंजाबसाठी वापरणार आहोत अशी माहिती ट्विटरद्वारे गडकरी यांनी दिली. तसंच, रावी नदीवर शाहपूर-कानडीचं बांधकाम सुरु झालं आहे. हे सर्व राष्ट्रीय प्रकल्प असल्याचंही गडकरींनी सांगितलं.

पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर आणि पंजाबसह इतर राज्यांना होणार आहे.

सिंधू नदी खोऱ्याचे दोन भाग आहेत. यापैकी पश्चिम खोऱ्याचं पाणी पाकिस्तानला, तर पूर्व खोऱ्याचं पाणी भारताला मिळतं. व्यास, रावी आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी भारतातून पाकिस्तानला जाते. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाण्यासाठी वणवण होण्याची शक्यता आहे. तीन नद्यातील पाणी प्रकल्पाद्वारे पाकिस्तान ऐवजी यमुना नदीत सोडले जाईल.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी सातत्याने पाऊल उचलताना दिसत आहे.