झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील एका व्यक्तीचा या महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक पोलीस आणि बेकायदेशीर अवैध दारू व्यापारात सहभागी असलेल्या गुन्हेगारांमध्ये झालेल्या चकमकीत तो अडकला होता. गोळीबारात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती कुटुंबातील सदस्य आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विजय कुमार माहतो (२७) असे या व्यक्तीचे नाव असून तो डुमरी ब्लॉकमधील दुधापानिया गावातील रहिवासी होता. विजय हा सौदी अरेबियामधील ह्युंदाई इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करत होता. त्याच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, तो एका वर्षभरापूर्वी ट्रान्समिशन लाइन प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी तेथे गेला होता.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना महतो यांचे नातेवाईक राम प्रसाह महतो यांनी सांगितले की ही घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली. विजय हा त्याच्या कामाच्या ठिकाणी चालत होता आणि तो पोलीस आणि न्हेगारांमध्ये सुरू असलेल्या गोळीबारात सापडला.

“गोळीबार सुरू झाला तेव्हा विजय जवळपासच होता. त्याला चुकून गोळी लागली,” असे राम प्रसाद यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की विजयला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा जीव वाचू शकला नाही. विजयच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबीयांना २४ ऑक्टोबर रोजी मिळाली.

“मृत्यूच्या आधी त्याने आपल्या पत्नीला कोरथा भाषेत एक व्हॉईस नोट देखील पाठवली होती, ज्यात त्याने सांगितले होते की त्याला दुसऱ्या कोणासाठीतरी झाडलेले गोळी लागली आहे आणि तो मदतीसाठी विनंती करत होता,” असे राम प्रसाद म्हणाले.

विजय याच्या मागे त्याची पत्नी, ५ आणि ३ वर्षांची दोन मुले आणि पालक आहेत.

स्टेट मायग्रंट कंट्रोल सेलच्या प्रमुख शिखा लाक्रा यांनी सांगितले की, या घटनेबाबत त्यांना डुमरीचे आमदार जयराम कुमार महतो यांच्याकडून तक्रार मिळाली आहे आणि त्यांचे पार्थिव परत आणण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. “या विभागाने तपास आणि मृतदेह परत आणण्यासाठी हे प्रकरण रियाधमधील भारतीय दूतावास आणि प्रोटेक्टर ऑफ एमिग्रंट्स (रांची) यांच्याकडे पाठवले आहे,” असे त्या म्हणाल्या.

 रियाधमधील भारतीय दूतावासाने झारखंड सरकारला दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना जेद्दाह भागात घडली, जो कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया (CGI), जेद्दाहच्या अधिकारात येतो. सीजीआय (CGI) ने सांगितले की हा मृत्यू संशयास्पद मानला जात आहे आणि तपास पूर्ण होईपर्यंत व पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट जारी होईपर्यंत महतो यांचे पार्थिव मक्का येथील जुमूम येथील पब्लिक प्रॉसेक्युशन ऑफिसच्या (Public Prosecution Office) ताब्यात राहील.

शिखा यांनी सांगितले की सरकार हे सौदी अधिकारी आणि विजय नोकरी करत होता त्या कंपनीच्या संपर्कात आहे.

कुटुंबाने सांगितले की त्यांनी कंपनी जोपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे मान्य करत नाही तोपर्यंत पार्थिव परत आणण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण न करण्याचा निर्णय घेतला आहे. “यासाठी कंपनीला जबाबदार धरले गेले पाहिजे. आम्हाला नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असे राम प्रसाद म्हणाले.