ऑस्ट्रेलियातील सिडनी या ठिकाणी झालेल्या भीषण कार अपघातात आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या भारतीय महिलेचा मृत्यू झाला. समनविता धारेश्वर असं या महिलेचं नाव आहे ती ३३ वर्षांची होती. समनविता तिच्या तीन वर्षांच्या मुलासह आणि पतीसह चालत चालली होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या BMW कारने तिला उडवलं. या अपघातात तिचा मृ्त्यू झाला.
पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समन्विता धारेश्वर त्यांच्या पतीसह आणि तीन वर्षांच्या मुलासह हॉर्न्सबी येथील जॉर्ज स्ट्रीट भागातून जात होत्या. यावेळी रस्ता ओलांडून जात असताना एका किया कार्निव्हल कारने त्यांना जाता यावं म्हणून वेग कमी केला. मात्र त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने किया कारला धडक दिली. हा धक्का इतका जबरदस्त होता की की किया कार पार्कच्या प्रवेशद्वारातून येऊन थेट समन्विता यांना धडकली. अपघातानंतर समन्विता यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाी १९ वर्षीय चालक अरोन पापा झोग्लूला पोलिसांनी अटक केली आहे.
डॉक्टरांनी समन्विता यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समन्विता धारेश्वर अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने वेस्टमीड रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा आणि त्यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. आरोन पापाजोग्लू या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. कार चालकाला कुठलीही जखम झालेली नाही. समन्विता धारेश्वर यांच्या लिंक्डइन प्रोफाइल नुसार त्यांना एक आयटी अॅनालिस्ट होत्या. एल्स्को युनिफॉर्म्ससाठी त्या अॅनालिस्ट म्हणून काम करत होत्या. या अपघातात समन्विता धारेश्वर यांचे पती आणि तीन वर्षांचा मुलगा यांना काहीही झालेलं नाही.
