Indian-origin girl raped in racially aggravated attack in UK : गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांवर वंशद्वेषातून प्रेरित हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, आता युनायटेड किंगडममधील (UK) वेस्ट मिडलँड्स येथे भारतीय वंशाच्या २० वर्षीय तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीवर तिच्या वांशिक ओळखीमुळे हा हल्ला करण्यात आला. वॉल्सॉल पार्क हॉल परिसरात ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी रस्त्यावर रडताना आणि घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर तिची विचारपूस केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर याप्रकरणी एका ३२ वर्षीय इसमाला पेरी बार परिसरातून अटक करण्यात आली आहे.
वांशिक तिरस्कारातून बलात्कार
डिटेक्टिव्ह सुप्रीटेंडेन्ट रॉनन टायरर म्हणाले, “पीडितेला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्थिर राहण्यास मदत करण्यासाठी विशेष प्रशिक्षित अधिकारी सहाय्य करत आहेत. हा racially aggravated attack (वांशिक तिरस्कारातून केलेला हल्ला) आहे.”
लोकांमध्ये भीतीचं वातावरण
वेस्ट मिडलँड्स पोलिसांचं पल्बिक प्रोटेक्शन युनिट, फॉरेन्सिक टीम व स्थानिक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे. घटना ज्या ठिकाणी घडली तिथले व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत, तसेच साक्षीदार जमवत आहेत. वॉल्सॉलचे मुख्य पोलीस अधीक्षक फिल डॉल्बी म्हणाले, “या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी स्थानिकांशी बातचीत सुरू केली असून पुढील काही दिवसांत या भागात पोलिसांची गस्त वाढवली जाईल.”
या घनटेवर ब्रिटिश शीख खासदार प्रीत कौर गिल व तन्मनजीत सिंह धेसी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वेस्ट मिडलँड्समध्ये महिलांवर वांशिक तिरस्कारातून होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. हे यूकेमधील वाढत्या द्वेषाचं व हिंसाचाराचं लक्षण आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
खासदार प्रीत कौर गिल यांनी व्यक्त केला संताप
प्रीत कौर गिल म्हणाल्या, “अलीकडेच ओल्डबरी व हेल्सओव्हेनमध्ये देखील महिलांवर असेच हल्ले झाले आहेत. वांशिक द्वेष हेच या वाढत्या हिंसाचारामागचं प्रमुख कारण आहे.” तर, धेसी म्हणाले, “द्वेष पसरवण्याचे खरे परिणाम आता आपल्यासमोर आहेत आणि आपण पोलिसांनी शक्य तितकं सहकार्य करायला पाहिजे.” आरोपीची सध्या चौकशी चालू असून पोलिसांनी या घटनेप्रकरणी साक्षीदारांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.
