New Zealand Minister Erica Stanfords Remark: न्यूझीलंडच्या एमिग्रेशन मंत्री एरिका स्टॅनफोर्ड यांनी संसदेच्या अधिवेशनात नुकतेच केलेले एक विधान वादात सापडले आहे. भारतीय नागरिकांकडून येणाऱ्या ईमेल्सना एरिका यांनी स्पॅम ईमेल म्हटले होते. ६ मे रोजी संसदेतील एका चर्चासत्रादरम्यान एरिका स्टॅनफोर्ड यांनी म्हटले, “मला अनेक अनावश्यक ईमेल येतात. जसे की, भारतातील लोकांकडून इमिग्रेशन बाबत सल्ला मागणारे इमेल येतात. मी कधीही त्यांना प्रतिसाद देत नाही. हे ईमेल जवळजवळ स्पॅमसारखेच मानते.”
मंत्री स्टॅनफोर्ड यांच्या विधानावमुळे न्यूझीलंडमध्ये वाद निर्माण झाला असून अनेकांनी त्यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी एका विशिष्ट वांशिक गटाला लक्ष्य केल्याचा आरोप केला जात आहे. भारतीय वंशाच्या खासदार प्रियांका राधाकृष्णन यांनी या विधानाचा निषेध केला. स्टॅनफोर्ड यांचे विधान बेजबाबदार आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे त्या म्हणाल्या.
स्टॅनफोर्ड यांनी केलेली टिप्पणी संपूर्ण समुदायाबद्दल नकारात्मकता निर्माण करते, असेही प्रियांका राधाकृष्णन द इंडियन विकेंडरला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाल्या. एका विशिष्ट वांशिक गटाला मंत्र्यांनी लक्ष्य केले असून ही निषेधार्ह बाब आहे. विशेषकरून जेव्हा भारत आणि न्यूझीलंड यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण आहेत.
दरम्यान मंत्री एरिका स्टॅनफोर्ड यांनी एका निवेदनाद्वारे टीकेला उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, मी भारतीयांच्या ईमेलला स्पॅम म्हणाले नाही. मी असे म्हणाले की, ते जवळजवळ स्पॅमसारखे असतात. माझ्या वैयक्तिक ईमेल अकाऊंटवर अनेक अनावश्यक ईमेल येतात, त्याबाबत मी भाष्य केले होते. यात भारतीयांच्या ईमेलचा संदर्भ नव्हता.
पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर २७ नोव्हेंबर २०२३ पासून स्टॅनफोर्ड यांची इमिग्रेशन मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.