नवी दिल्ली : देशातील विविध प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या मातींमध्ये नायट्रोजन आणि कार्बन, हायड्रोजन बंध असलेल्या संयुगांची (ऑरगॅनिक कार्बन) यासारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे. दिल्लीस्थित ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ (सीएसई) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालात हा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या ‘मृदा आरोग्य कार्ड डेटा’च्या आधारे हा अभ्यास करण्यात आल्याचे ‘सीएसई’कडून सांगण्यात आले.

या अभ्यासानुसार, देशातील ६४ टक्के नमुना मातीमध्ये नायट्रोजनची तर ४८.५ टक्के जमिनीत ऑरगॅनिक कार्बनचे प्रमाण कमी असल्याचे आढळले. जमिनीची सुपीकता आणि हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता यासाठी हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. जमिनीचा कस वाढवण्यासाठी खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करूनही जमीन पुरेशी सुपीक झालेली नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राजस्थानच्या निमली येथे ‘अनिल अग्रवाल एन्व्हायर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘सस्टेनेबल फूड सिस्टीम्स – ॲन अजेंडा फॉर क्लायमेट-रिस्क्ड टाइम्स’ या शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ऑरगॅनिक कार्बन धारण करण्याची क्षमता हे सुपीक जमिनीचे महत्त्वाचे कार्य असते, हवामान बदलाच्या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी ते आवश्यक असते.

अहवालाचे निष्कर्ष

– नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश (एनपीके) खतांचा वापर करूनही जमिनीमधील नायट्रोजनचे प्रमाण सुधारले नाही

– नायट्रोजन, ऑरगॅनिक कार्बनच्या कमतरतेमुळे दीर्घकालीन उत्पादकतेवर आणि कार्बन धरून ठेवण्याच्या जमिनीच्या क्षमतेवर विपरित परिणाम

योजनेचा अपुरेपणा

केंद्र सरकारने २०१५मध्ये सुरू केलेल्या मृदा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत १२ रासायनिक निकषांची तपासणी केली जाते आणि त्यानुसार शेतकऱ्यांना कोणती खते वापरावीत यासाठी शिफारशी केल्या जातात. मात्र, देशात १४ कोटी शेतकरी कुटुंबे असून हे मृदा कार्ड केवळ १.१ कोटी कुटुंबांपर्यंतच पोहोचले आहे, त्यामुळे त्या आधारे राबवण्यात आलेल्या धोरणांमध्ये तफावत राहते, असे निरीक्षण ‘सीएसई’ने नोंदवले आहे.