नवी दिल्ली : कॅलिफोर्नियातील ‘वँडेनबर्ग स्पेस फोर्स’ तळावरून बुधवारी ‘स्पेसएक्स’च्या फाल्कन-९ रॉकेटवरून ‘पिक्सेल स्पेस’ आणि ‘ध्रुव स्पेस’ या दोन स्टार्ट-अप्सनी यशस्वीरित्या उपग्रह प्रक्षेपित केले. ‘पिक्सेल’ने या वर्षी जानेवारीमध्ये तीन फायरफ्लाय उपग्रह प्रक्षेपित केले होते. पिक्सेलच्या उपग्रह प्रक्षेपणामुळे स्टार्ट-अपच्या सहा हायपरस्पेक्ट्रल उपग्रह संरचनेच्या पहिल्या टप्प्याची पूर्तता झाली असून, त्यामुळे पृथ्वीला जवळून आणि स्पष्टपणे पाहणे शक्य होणार आहे.

‘सर्व ३ फायरफ्लाय यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले’, असे बंगळूरुस्थित पिक्सेल स्पेसचे संस्थापक आणि सीईओ अवैस अहमद यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. हैदराबादस्थित ध्रुव स्पेसद्वारे ऑस्ट्रेलियाच्या अकुला टेक आणि एस्पर सॅटेलाइट्सकडून अभिभार (पेलोड) घेऊन जाणारा त्यांचा पहिला व्यावसायिक ‘लीप-०१’ उपग्रहही प्रक्षेपित करण्यात येणार आहे.