मृतांमध्ये मुंबईच्या मुलीचा समावेश
अमेरिकेत एका विद्यापीठात संचलन सुरू असताना मद्यपी महिलेची मोटार गर्दीत घुसून झालेल्या अपघातात चार जण मरण पावले आहेत. त्यात मुंबई येथील निकिता नकाल या विद्यार्थिनीचा समावेश आहे. या घटनेत इतर ४० जण जखमी झाले आहेत. तीन प्रौढांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन वर्षांचा मुलगा रुग्णालयात जखमी अवस्थेत मरण पावला, असे स्टीलवॉटर पोलिसांनी म्हटले आहे.
निकिता नकाल हिचा मृतांमध्ये समावेश असून युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल ओक्लाहोमा येथे ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या महिलेचे नाव अ‍ॅडाशिया अ‍ॅव्हरी चेंबर्स (वय २५) असल्याचे सांगितले. तिला ताब्यात घेण्यात आले आहे. चेंबर्स हिने ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संचलनावेळी अडथळे तोडून गाडी आत घातली. ही गाडी ताशी ७२-८० किलोमीटर वेगाने घुसली तेव्हा कोपऱ्यात १०० लोक उभे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ जणांची प्रकृती गंभीर असून इतर सतरा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे. निकिता नकाल ही मुंबईची विद्यार्थिनी एमबीएच्या वर्गात शिकत होती.