भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर अमिरेकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला होता. अमेरिकेतील फेड्रेशन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) यासंदर्भातील माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॉन्टेकट या तीन राज्यांमधील भारतीयांचा समावेश असणाऱ्या एफआयएने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “आम्ही इतिहास घडवणार आहोत,” असं म्हटलं आहे. “१५ ऑगस्ट २०२० रोजी टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडवणार आहोत,” असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे. दरवर्षी एफआयएकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. यानिमित्त छोट्या परेडचंही आयोजन करण्यात येतं. मात्र यंदा करोनाचा पार्श्वभूमीवर परेड रद्द करण्यात आली आहे.  “इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारताचा तिरंगा या जगप्रसिद्ध ठिकाणी फडकवला जाणार असल्याचा आनंद आहे,” असं एफआयने आपल्या पत्रात म्हटलं आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासचे रणधीर जैसवाल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एफआयएचे माजी अध्यक्ष अशोक कुमार यांनीही ट्विटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकण्याबरोबरच दरवर्षीप्रमाणे एम्पायर स्टेट इमारतीवर तिरंग्याच्या रोषणाई करण्यात येणार असल्याचे एफआयएने आपल्या पत्रकामध्ये नमूद केलं आहे. एम्पायर स्टेट बिल्डींगवर १४ ऑगस्टच्या रात्रीपासून तिरंग्याची रोषणाई करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या एफआयएची स्थापना १९७० साली झाली आहे. जुलै महिन्यामध्ये अंकुर विद्या यांची एफआयएच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यापूर्वी या पदावर भारतीय अमेरिकन समाजाचे नेतृत्व करणारे रमेश पटेल हे एफआयएचे अध्यक्ष होते. मात्र करोनामुळे त्यांचे निधन झाल्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. विद्या हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.

न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावासाने स्वातंत्रदिनाच्या उत्सव व्ह्यच्यूअल पद्धतीने साजरा करणार आहे. या कार्यक्रमासाठी, “भारतीय समाज आणि भारताच्या सर्व सहकारी देशांना आमंत्रित करीत आहोत,” असं दूतावासाने म्हटलं आहे. या सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण केलं जाणार आहे. “टाइम्स स्क्वेअरवरील ध्वजारोहणाचा कार्यक्रम हे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या देशभक्तीचे आणि देशाबद्दलच्या प्रेमाचे प्रतिक आहे. एफआयएच्या स्थापनेचं हे सुवर्ण मोहत्सवी वर्ष आहे,” असं एफआयएने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian tricolour will be hoisted at the iconic times square in new york on indian independence day scsg
First published on: 12-08-2020 at 12:29 IST