अमेरिकेतील एका कंपनीत कारकून म्हणून काम करणाऱ्या भारतीय युवकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांबद्दल माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे.
मनप्रीत घुमान सिंग (२७) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो पंजाबमधील माजरी किशनवाली गावचा रहिवासी आहे. तो कॅलिफोर्नियातील दक्षिण लेक ताहोई भागातील एका गॅस स्टेशनवर काम करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. मनप्रीत याची ६ ऑगस्ट रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एफबीआयचीही मदत घेतली आहे. व्हिडीओ फुटेजच्या मदतीने पोलिसांनी दोन आरोपींची छायाचित्रे मिळवली आहेत. मात्र त्यांचा दर्जा योग्य नसल्यामुळे आणि हल्लेखोरांनी चेहरे झाकलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, मनप्रीतचा मृतदेह भारतात आणून  शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.