भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यासोबत केलेल्या ट्वीटमध्ये खलिस्तानवाद्यांच्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीयांवर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याचं या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून भारतीयांवरील या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. यासंदर्भात दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
मनजिंदर सिंग सिरसा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. “ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान समर्थकांकडून चालू असलेल्या भारतविरोधी कारवायांचा मी कडवा निषेध करतो. अशा प्रकारे असामाजिक कृत्यांनी समाजातील शांततेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे”, असं ट्वीट सिरसा यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारताचा तिरंगा हातात घेतलेल्या काही व्यक्तींवर खलिस्तारचा झेंडा हातात घेतलेल्या काही व्यक्ती हल्ला करत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
दोन जणांना अटक
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील पोलिसांनी यासंदर्भात तातडीने पावलं उचलंत दोन जणांना अटक केली आहे. हे दोघे साधारण ३० वर्षांच्या वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांकडून देम्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पाच भारतीयांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये घडणाऱ्या अशा घटनांमुळे खलिस्तार समर्थकांच्या कारवाया वाढू लागल्याचं स्पष्ट होत असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा संघटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.