भारतात राहून पाकिस्तानचे कौतुक करणाऱयांना चपलेने झोडून त्यांना पाकिस्तानमध्येच हाकलून लावले पाहिजे असे प्रक्षोभक विधान करून विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी बालिका सरस्वती यांनी वादाला तोंड फोडले आहे. या विधानावरून पोलीस साध्वींविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचेही समजते.
मध्यप्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या हिंदू समाजोत्सवात प्रमुख वक्त्या म्हणून साध्वी बालिका सरस्वती उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “भारतात राहून पाकिस्तानचे कौतुक करणाऱयांना इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही. अशांना चपलेने झोडायला हवे आणि पाकिस्तानात पाठवायला हवे.” इतकेच नव्हे तर, हिंदूंनी अयोध्येप्रमाणेच पाकमधील इस्लामाबादमध्येही राम मंदिर बांधायला हवे, अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली. तसेच ‘लव्ह जिहाद’वर टीका करताना साध्वी म्हणतात, “आता हातावर हात धरून शांत बसण्याची वेळ नाही. डोळ्याच्या बदल्यात डोळा घेण्याची वेळ आली आहे. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळते हा इतिहास झाला पण, आता हातात शस्त्र घेतल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही.”
दरम्यान, साध्वी बालिका सरस्वती यांच्या या वादग्रस्त विधानाची मध्यप्रदेश पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून साध्वींच्या भाषणाची सीडी तपासली जात आहे. त्यांच्या भाषणात आक्षेपार्ह आढळल्यास योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱयांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians praising pakistan should be hit with shoes says sadhvi balika saraswati
First published on: 05-03-2015 at 02:21 IST