भारतातील प्रसिद्ध सेक्स तज्ज्ञ डॉ. महिंदर वत्स यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. सेक्स एक्सपर्ट असण्याबरोबरच ते प्रसुतीतज्ज्ञही होते. ‘आस्क द सेक्सपर्ट’ हा त्यांचा कॉलम विशेष गाजला. १० वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी या कॉलमच्या माध्यमातून हजारो वाचकांच्या सेक्स संबंधींच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. स्वत:च्या अटी-शर्तींवर डॉ. महिंदर वत्स सुंदर आयुष्य जगले, असे त्यांच्या मुलांनी म्हटले आहे.
मृत्यूसमयी ते कुठल्या आजाराने त्रस्त होते का? ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. वयाच्या ८० व्या वर्षी डॉ. महिंदर वत्स यांनी मुंबई मिरर या दैनिकात सेक्स संबंधी सल्ला देणारा कॉलम लिहायला सुरुवात केली. ६० च्या दशकात एका महिला मासिकात त्यांना ‘डिअर डॉक्टर’ कॉलम लिहायला सांगण्यात आले. त्यावेळी ते वयाच्या तिशीत होते.
पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी वाचक त्यांचे अनेक प्रश्न मांडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फॅमिला प्लॅनिंग असोशिएशन ऑफ इंडिया आणि त्यानंतर स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लैंगिकतेविषयी समाजात जागरुकरता निर्माण करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी समाजात सेक्सच्या विषयावर खुलेपणाने बोलता येत नव्हते, सेक्सकडे निषिद्ध दृष्टीकोनातून पाहिले जात होते, त्यावेळी डॉ. महिंदर वत्स यांनी लैंगिक आरोग्याबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लैंगिकतेविषयी अनेकांच्या मनातील संभ्रम दूर केले.