‘मंगळयान’ ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताची उत्तुंग झेप तर आहेच पण त्याबरोबरच चीनच्या या क्षेत्रातील स्थानास ‘प्रतीकात्मक धक्का’ देण्याचा हा भारताचा प्रयत्न म्हणायला हवा, अशा शब्दांत अमेरिकेतील सर्व प्रमुख प्रसार माध्यमांनी भारताच्या मंगळमोहिमेचे वर्णन केले आहे.
‘भारताची महत्त्वाकांक्षी मंगळ मोहीम जर यशस्वी झाली तर सर्वच दक्षिण आशियाई देशांच्या शिरपेचातील तो एक मानाचा तुरा असेल. अशाच मोहिमांमध्ये यापूर्वी अपयशी ठरलेल्या चीन आणि जपानसारख्या देशांवर भारताला यामुळे वरचष्मा राखता येईल,’ असे वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये म्हटले आहे.
भारताचा सख्खा शेजारी असलेला चीन अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात जबर महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. मात्र भारताच्या या मोहिमेमुळे ‘तांबडय़ा ग्रहावर’ पोहोचणारा पहिला आशियाई देश म्हणून त्याचे नाव झळकणार आहे. त्याबरोबरच, चीनच्या महत्त्वाकांक्षेसही यामुळे भारताचे आव्हान निर्माण होणार आहे, अशी प्रतिक्रिया सीएनएनने नोंदवली आहे.
भारताची मोहीम स्वस्त का?
नॅशनल पब्लिक रेडिओने भारताच्या मोहिमेच्या खर्चाकडे लक्ष वेधले आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे सरासरी वार्षिक उत्पन्न एक लाख पाच हजार डॉलर इतके आहे तर, भारतीय शास्त्रज्ञांचे सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ वीस हजार डॉलर इतके आहे. केवळ मंगळापर्यंत पोहोचणे, हेच उद्दिष्ट असल्याने ही मोहीम कमी गुंतागुंतीची आहे. स्वाभाविकच त्यावर बसविण्यात आलेली उपकरणेही फारशी महागडी नसावीत, असे मत राईस इन्स्टिटय़ूटच्या डेव्हिड अलेक्झांडर यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2013 रोजी प्रकाशित
भारताची मंगळमोहीम चीनला ‘धक्का’ देण्यासाठीच! – अमेरिकी प्रसारमाध्यमे
‘मंगळयान’ ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताची उत्तुंग झेप तर आहेच पण त्याबरोबरच चीनच्या या क्षेत्रातील स्थानास ‘प्रतीकात्मक धक्का’
First published on: 07-11-2013 at 03:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias mars mission to shake china us media