Indigo : अहमदाबादमध्ये इंडिगोचं विमान तांत्रिक बिघाडामुळे टेक ऑफ करतानाच थांबवण्यात आलं. या विमानातील सर्व ७० प्रवासी सुखरुप आहेत. आज 6E 7966 हे विमान उड्डाणासाठी निघालं. हे विमान अहमदाबादहून दिऊला चाललं होतं. त्यावेळी वैमानिकाला इंजिनाला आग लागल्याचा तातडीचा संदेश मिळाला आणि त्याने प्रसंगावधान दाखवून हे विमान टेक ऑफच्या वेळीच थांबवलं. आज सकाळी ११ च्या दरम्यान ही घटना घडली.
विमानातील ७० प्रवासी सुखरुप
अहमदाबादहून हे विमान दिऊला चाललं होतं. विमान थांबवण्यात आल्यानंतर या विमानातील सर्व ७० प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. तसंच तातडीच्या सेवाही सक्रिय झाल्या आणि इंजिनाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
इंडिगोच्या प्रवक्त्याने काय सांगितलं?
इंडिगोच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत माहिती देताना हे सांगितलं की विमानाचं उड्डाण (Take Off) होत असतानाच वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संदेश मिळाला. त्यानंतर हे विमान सगळ्या औपचारिकता पाळून टेक ऑफच्या वेळीच रोखण्यात आलं. वैमानिकाने रनवे जवळच हे विमान थांबवलं त्यानंतर या विमानातून ७० प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. विमानाची दुरुस्ती आणि पुन्हा एकदा व्यवस्थित तपासणी केली जाईल.
प्रवाशांना देण्यात आले दोन पर्याय
इंडिगोच्या या विमानाने जे प्रवासी दिऊला चालले होते त्यांना दिलासा देण्यासाठी रिफंड किंवा पुढच्या विमानाने जाण्याची सुविधा असे दोन्ही पर्याय इंडिगोने दिले. या दोन पैकी जो पर्याय प्रवासी निवडतील तो आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत असं आम्ही त्यांना सांगितल्याचंही इंडिगोच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी गोव्याहून इंदूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातही विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली होती. मात्र हे विमान धावपट्टीवर सुखरुप उतरवण्यात आलं. त्यानंतर या विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली.