Donald Trump Tariff on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादल्याची घोषणा बुधवारी सायंकाळी केली. त्यामुळे भारतात एकच खळबळ उडाली. १ ऑगस्टपासून भारतावर २५ टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा ट्रम्प यांनी आधीच केली होती. आता आणखी कर लावल्यामुळे एकूण टॅरिफ ५० टक्क्यांवर गेले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली जात आहे. काँग्रेसने थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे.
तसेच इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे अमेरिकेच्या दादागिरीला मोडून काढले होते, त्यातून काहीतरी शिकावे, असा सल्ला काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट टाकत पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, “१९७० च्या दशकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या दादागिरीला मोडून काढले होते. इंदिरा गांधींची बदनामी करण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी आपला अहंकार बाजूला ठेवत त्यांच्याकडून काहीतरी शिकावे. जर शक्य असेल तर इंदिरा गांधींनी ज्याप्रकारे अमेरिकेला तोंड दिले, त्यापासून प्रेरणा घ्यावी. भारताचे परराष्ट्र धोरणाची पुनर्रचना करण्याची आता गरज आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर आता ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींना १९७१ च्या पाकिस्तान युद्धआधीच्या इंदिरा गांधींच्या अमेरिका दौऱ्याची आठवण करून दिली. तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना इंदिरा गांधींनी सडेतोडपणे उत्तर दिले होते. पंतप्रधान मोदींनी प्रसिद्धीसाठी आंलिगन देणे आणि वैयक्तिक संबंध दाखविण्याच्या शैलीमुळे आपल्याला अपयशाला सामोरे जावे लात आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
जयराम रमेश पुढे म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अजूनही मोदींना आपले मित्र म्हणत आहेत आणि तरीही भारतावर अन्यायकारक आणि कठोर असे आयातशुल्क लादत आहेत. त्यांनी लादलेले आयातशुल्क स्वीकारता येणार नाही.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाले, मोदींनी भारतातील जनतेसाठी आपल्या कमकुवतपणावर मात करावी आणि ट्रम्प यांच्या दादागिरीला तोंड द्यावे.