पीटीआय, ह्युस्टन (टेक्सास, अमेरिका) : अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील उव्हाल्दे गावातील प्राथमिक शाळेत एका माथेफिरू युवकाने केलेल्या गोळीबारात १९ शालेय विद्यार्थ्यांसह २१ जण मृत्युमुखी पडले. यात दोन प्रौढांचा समावेश आहे. अमेरिकेत आतापर्यंत गोळीबारातून झालेल्या नृशंस हत्याकांडापैकी हे एक हत्याकांड ठरले आहे. यामुळे भावूक झालेले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींना ही वेदना कृतीत बदलून शस्त्रास्त्र उत्पादकांच्या दबावगटावर (लॉबी) नियंत्रण आणण्याचे आवाहन केले आहे.

टेक्सास प्रांतातील उव्हाल्दे गावातील रोब प्राथमिक शाळेत स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेअकराच्या सुमारास साल्वादोर रामोस या माथेफिरू युवकाने बेछूट गोळीबार केला. सुरक्षा दलांच्या गोळीबारात तोही ठार झाला आहे. तपासकर्त्यांनी सांगितले, की हा तरुण अर्ध स्वयंचलित ‘एआर-१५ हँडगन’ घेऊन आला होता. रोमोस हा या शाळेच्या परिसरातील रहिवासी असल्याचे टेक्सास प्रांताचे राज्यपाल ग्रेग अबोट यांनी सांगितले. या हत्याकांडामागील त्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार या तरुणाने आपल्या आजीवरही गोळीबार केल्याचे समजते. त्याच्या गोळीबारात एका शिक्षकासह १४ विद्यार्थी जागीच ठार झाले. त्यानंतर हा आकडा वाढूून १९ विद्यार्थी आणि दोन शिक्षक या घटनेत मृत्युमुखी पडले. पोलिसांशी झालेल्या चकमकीत रामोसही मृत्युमुखी पडला. या घटनेत दोन सुरक्षा अधिकारीही जखमी झाले आहेत. परंतु त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे अबोट यांनी सांगितले. मृत्यमुखी पडलेले विद्यार्थी दुसरी, तिसरी व पाचवीतील असून पाच ते ११ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांची नावे व इतर तपशील अद्याप कळायचा आहे.

‘यापेक्षा अधिक गंभीर काय घडावे लागेल?’ 

जपानमधील क्वाड परिषदेहून परतलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना याविषयी अवगत करण्यात आले. या घटनेने भावविवश झालेल्या बायडेन यांनी देशवासीयांना संबोधित करताना या संदर्भात निर्णायक कृती करण्याची वेळ आली आहे, हे पटण्यासाठी लोकप्रतिनिधींना यापेक्षा अजून गंभीर काय घडावे लागेल, असा सवाल त्यांनी विचारला. या घटनेनंतर शोकसंतप्त झालेल्या अमेरिकन नागरिकांचे सांत्वन करताना बायडेन म्हणाले, की बलाढय़ बंदूक उत्पादकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृतीची गरज आहे. अशा रक्तलांछित घटना रोखण्यासाठी आपल्या देशाकडे कणा नाही का, असा सवालही त्यांनी वारंवार उपस्थित केला.

‘वेदना कृतीत परिवर्तित करा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भयानक घटनेत किती मुलांनी आपले मित्र मरताना प्रत्यक्ष पाहिले असतील. ही शाळा रणभूमी झाल्याप्रमाणे त्यांना  वाटले असेल. एका मुलाचा मृत्यू म्हणजे आपल्या आत्म्याचा तुकडाच पडल्यागत वाटतो. आपल्या हृदयात खड्डाच पडल्यासारखा वाटतो. बंदूक नियंत्रण कायद्याबाबत बोलताना त्यांनी लोकप्रतिनिधींना आवाहन केले, की ही वेदना आता कृतीत परावर्तित करा. त्यांनी यावेळी २०१२ पासूनच्या गोळीबारात झालेल्या सामूहिक हत्याकांडांचा आढावा घेतला. बायडेन उपाध्यक्ष असताना कनेक्टिकटच्या न्यू टाऊन येथील सँडी हूक प्राथमिक शाळेत झालेल्या मुलांच्या भयंकर हत्याकांडाचाही उल्लेख केला.