Indore Couple : इंदूर या ठिकाणी राहणारा राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे लग्नानंतर मधुचंद्रासाठी शिलाँगला गेले होते. २३ मे पासून राजा आणि सोनम यांचा संपर्क त्यांच्या कुटुंबाशी झाला नाही. त्यानंतर काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी शिलाँग गाठलं. पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या, व्यक्तिगत पातळीवर शोध सुरु केले. अखेर ११ दिवसांनी म्हणजेच २ जूनच्या दिवशी दुपारी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. हा मृतदेह साफ कुजला होता. त्या मृतदेहावरील हातावर असलेल्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली. राजा रघुवंशीची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान राजाची पत्नी सोनम ही अद्यापही बेपत्ताच आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशीचं लग्न सोनमशी झालं. ११ मे रोजी हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर २० मे रोजी राजा आणि सोनम दोघंही मधुचंद्रासाठी रवाना झाले. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम हे दोघंही सुरुवातीला बंगळुरुला गेले. त्यानंतर बंगळुरुमार्गे हे दोघंही गुवाहाटीला गेले. गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. २० ते २२ मे या कालावधीत राजा आणि सोनम दोघंही त्यांच्या कुटुंबांच्या संपर्कात होते. २३ मे रोजी आम्ही शिलाँगला जात आहोत तिथून फोन करतो असं या दोघांनीही कुटुंबाला सांगितलं होतं. मात्र शिलाँगला ते दोघंही गेल्यापासून त्यांचा संपर्क तुटला. या दोघांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे शिलाँग या ठिकाणी दाखवतं होतं. या दोघांनीही शिलाँगमध्ये फिरण्यासाठी भाडे तत्त्वावर फिरण्यासाठी मिळणारी अॅक्टिव्हा घेतली होती अशीही माहिती समोर आली. यानंतर या दोघांचाही शोध सुरु होता. पोलिसांना २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला.

२ जून रोजी पोलिसांना कसा सापडला राजाचा मृतदेह?

११ दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांच्या ड्रोनला दिसला. हा मृतदेह १५० फूट खोल दरीत होता. तसंच मृतदेह इतका सडला होता की त्याची ओळख पटवणं कठीण होतं. अखेर या मृतदेहाच्या हातावर राजा हे नाव गोंदलेलं होतं त्यावरुन त्याच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली. राजाची पत्नी सोनम अद्यापही बेपत्ता आहे. सोनम कुठे आहे? राजाचा मृत्यू कसा झाला? हे सगळे प्रश्न अद्यापही कायम आहेत. पोलिसांना राजाचा मृतदेह इस्ट खासी हिल्स भागात सापडला.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी सांगितलं की आम्हाला एक मोबाइल फोन घटनास्थळावरुन मिळाला आहे. तसंच मर्डर वेपन म्हणजेच हत्या ज्या हत्याराने झाली ते हत्यार सापडलं आहे. सोनमचं काय झालं ते अद्याप सांगता येणार नाही. तिचा शोध आम्ही घेत आहोत. पोलीस अधीक्षक विवेक साइम यांनी ही माहिती ANI ला दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजा रघुवंशीची हत्याच

राजा रघुवंशीचा मृतदेह शवविच्छेदन अहवाल आला. राजा रघुवंशीची हत्या झाली आहे हे पोलिसांच्या म्हणण्यानुसार स्पष्ट झालं आहे. कारण पोलिसांनी मर्डर वेपन मिळालं. नारळ सोलण्याच्या चाकूने किंवा झाड तोडण्याच्या धारदार शस्त्राने राजाची हत्या करण्यात आली. त्याच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने केलेले वार होते. राजाची हत्या करुन त्याला खोल दरीत फेकण्यात आलं.