नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनमध्ये बुधवारी झालेल्या सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२३ चे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना पद्मविभूषण, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांना  आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर  यांना पद्मभूषण पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. अब्जाधीश शेअर बाजारातील गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांना पद्मश्री (मरणोपरांत) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी १०६ पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी ५० हून अधिक जणांना बुधवारी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले आणि नंतर भाजपमध्ये सामील झालेल्या कृष्णा यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रख्यात वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी (मरणोत्तर) यांनाही देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.

बिर्ला, दिल्लीस्थित प्रा. कपिल कपूर, अध्यात्मिक गुरु कमलेश डी पटेल आणि कल्याणपूर यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला.

कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येतात.

नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून समाजासाठी वेगवेगळय़ा प्रकारे योगदान देणाऱ्या परंतु फारसे प्रसिद्ध नसलेल्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.