कोलकाता शहराला दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.आपल्या कुटुंबासह पदपथावर झोपलेला सहा महिन्यांचा एक चिमुकला रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहत जाऊन दगावला.
कोलकाता शहर गुरुवारपासून मान्सूनच्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडले आहे. फार मोठय़ा सखोल भागात ठिकठिकाणी पाणी साचले असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराच्या मध्य वस्तीतील एका पदपथावर राहणाऱ्या कुटुंबीयांजवळून त्यांचे सहा महिन्यांचे मूल वाहून गेले. ते नंतर विधान सरणी व तरक प्रामाणिक रोड क्रॉसिंगवर बेशुद्धावस्थेत आढळले. त्याला कोलकाता वैद्यकीय रुग्णालय व हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी चौकशी केली असता, या लहानग्याचे पालक जवळच्या मुक्तरामबाबू मार्गावर पदपथावर राहतात असे त्यांना कळले. हे कुटुंब झोपेत असताना मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे हे मूल वाहून गेले आणि सकाळी आमच्या कर्मचाऱ्यांना ते दिसले. यात काही गुन्हेगारी कृत्य असल्याचे अद्याप आढळले नसल्याचे हा अधिकारी म्हणाला.
गेल्या २४ तासात कोलकाता शहरात १४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे विभागीय वेधशाळेचे संचालक जी.सी. देबनाथ यांनी सांगितले. शुक्रवारी पावसाचा जोर कमी होईल आणि त्यानंतर तो आणखी कमी होईल, असेही ते म्हणाले.
जोरदार पावसामुळे अनेक शाळांनी शुक्रवारी सुटी जाहीर केली आणि ज्या शाळा सुरू होत्या, त्यांमध्ये विद्यार्थ्यांची फार कमी उपस्थिती होती.
रस्त्यांवर साचलेले पाणी फेकण्यासाठी कोलकाता महापालिकेने ४५० पोर्टेबल पंप लावले असल्याचे महापौर परिषदेचे (मलनिस्सारण) सदस्य तारक सिंग यांनी सांगितले.
सियाल्दा व हावडा रेल्वे स्थानकांवर उपनगरी गाडय़ा उशिराने धावत होत्या, तर रुळांवर पाणी साचल्याने काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. पाऊस थांबून पाणी कमी झाल्यानंतर रेल्वेसेवा सामान्य झाली, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infant drowns as rains plunge kolkata into chaos
First published on: 11-07-2015 at 02:46 IST