BSF Action Against Pakistani Intruder : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली आणि दोन्ही देशांतील तणाव काहीसा कमी होत असल्याची परिस्थिती समोर येत असतानाच आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला घुसखोरीचा प्रयत्न करत असताना ठार केल्याची माहिती समोर येत आहे. सदर व्यक्ती भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला भारतीय सैनिकांनी थांबण्यास सांगितलं. मात्र, त्याने सैनिकांकडे दुर्लक्ष केलं आणि तो आणखी पुढे जात राहीला. त्यानंतर सैनिकांनी केलेल्या गोळीबारात या संशयास्पद हालचाली करत असलेला व्यक्ती ठार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
बनासकांठा जिल्ह्याजवळ भारत-पाकिस्तान सीमा ओलांडून आलेल्या एका संशयित पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलाने गोळ्या घालून ठार केलं . ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या संदर्भातील निवेदन बीएसएफकडून जारी करण्यात आलं असून यामध्ये म्हटलं की, “बीएसएफ जवानांनी घुसखोराला आवाहन केलं. मात्र, त्याने दुर्लक्ष केलं आणि तो पुढे जात राहिला. पण यावेळी प्रत्युत्तरादाखल सैन्याने गोळीबार केला आणि घुसखोरीचा प्रयत्न जागीच हाणून पाडला.”
दरम्यान, या घुसखोराची ओळख किंवा घुसखोरीच्या प्रयत्नामागील हेतू काय होता? या संदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, याची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील घटना टाळण्यासाठी बीएसएफने या परिसरात गस्त आणि देखरेख वाढवल्याचं सांगितलं जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली असली तरी देखील सीमेवर बीएसएफचे जवान पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.