India Pakistan Tension : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, असं असतानाच दोन दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक करत मोठी कारवाई केली आहे.

यानंतर आता पंजाब सीमेवरून एका व्यक्तीने भारतात प्रवेश करत घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी या व्यक्तीकडून पाकिस्तानी चलन आणि ओळखपत्र जप्त करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकाला पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अटक केली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे. मोहम्मद हुसेन असं या व्यक्तीचं नाव असून त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली आहे.

राजस्थानमध्येही एका पाकिस्तानी रेंजरला अटक

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एका पाकिस्तानी रेंजरला भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. प्राथमिक तपासात असं दिसून आलं की हा रेंजर हेरगिरी किंवा गुप्तहेर हेतूने घुसला असावा, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं असून बीएसएफकडून त्याची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर चुकून पाकिस्तानी हद्दीत घुसल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉला ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसांतच एका पाकिस्तानी रेंजरला आणि एका पाकिस्तानी नागरिकाला घुसखोरीच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली आहे.

हेरगिरी करणाऱ्या दोघांना पंजाब पोलिसांनी केली होती अटक

दोन पाकिस्तानी गुप्तहेराना पंजाब पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. अमृतसर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी अमृतसरमधील लष्करी छावणी क्षेत्र आणि हवाई तळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे लीक करण्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आहे. या आरोपींची ओळख पटली असून शेर मसीह आणि सूरज मसीह अशी त्यांचे नावे असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं.