याकूब मेमनच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. भविष्यात त्यातले काही जण दहशतवाद घडवून आणू शकतात, असे धक्कादायक ट्विट त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे. याकूबच्या अंत्ययात्रेत कुटुंबिय आणि मित्रपरिवाराव्यतिरीक्त सहभागी झालेल्या लोकांवर गुप्तचर यंत्रणेने नजर ठेवावी. त्यातील काही जण भविष्यात दहशतवादाकडे ओढले जाऊ शकतात. त्यांच्यावर नजर ठेवणे हे दहशतवादाला रोखण्याचाच एक भाग आहे, असेही तथागत रॉय म्हणाले आहेत. दरम्यान, रॉय यांच्या ट्विटवर टीकेची राळ उठवली जात आहे. रॉय जातीयवाद निर्माण करण्याचे काम करीत असल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर रॉय यांनी उत्तरादाखल पुढील ट्विटमध्ये म्हटले की, मी माझ्या ट्विटमध्ये कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल बोललेलो नाही. त्यामुळे मी जातीयवादी आहे, असा आरोप कसा काय केला जाऊ शकतो?, असा सवाल रॉय यांनी उपस्थित केला. जनहिताशी संबंधित एखादी बाब नजरेस आणून देणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. असे करून राज्यपालपदाच्या कोणत्याही मर्यादा ओलांडलेल्या नसल्याचेही रॉय पुढे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intelligence should keep a tab on all who assembled bfr yakub memon corpse says tathagata roy
First published on: 31-07-2015 at 04:52 IST