International Yoga Day  योग्य प्रशिक्षणाद्वारे आणि शरीर, मन व बुद्धी यांच्या एकात्मिकरणाद्वारे अंतर्गत क्षमता जाणून घेण्याचे साधन म्हणजे योग. योगमुळे आपल्याला दैनंदिन जीवनातही अधिक कार्यक्षम होण्यासाठी मदत होते. योगामुळे आपले आरोग्य सुधारते, कल्याणाची जाणीव होते व वैश्विक मूल्यांप्रती संवेदनशीलता वाढते. खरे तर, जीवनशैलीविषयक आजार व ताणतणाव असणाऱ्या सध्याच्या काळात योग हे मनुष्यासाठी वरदान ठरत आहे. यामुळेच दिवसेंदिवस योगाची लोकप्रियता वाढते आहे. योगाचे मूळ भारतात आहे, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा.

अन्य स्वरूपाच्या व्यायामांच्या तुलनेत योगाचे वेगळेपण काय आहे, असे अनेक जण विचारतात. सर्व प्रकारच्या व्यायामांमुळे शरीर व मन यांना अनेक फायदे होतात. परंतु, अन्य प्रकारच्या व्यायामांतून होणाऱ्या फायद्यांच्या तुलनेत योग केल्याने होणारे फायदे सरस आहेत. बहुतेकशा व्यायाम प्रकारांमध्ये फॅट कमी होण्यासाठी व स्नायू विकसित होण्यासाठी झपाट्याने शारीरिक हालचाली केल्या जातात. याउलट, योगाचे उद्दिष्ट शरीरातील सर्व भाग निवांत करणे व शरीरातील ऊर्जेला योग्य मार्ग करून देणे, हे असते. यामुळे सर्व अवयवांचे व ग्रंथींचे आरोग्य सुधारते आणि आजार कमी होतात. त्यामुळे आपल्या नसा शुद्ध होतात. आमचे मन सक्षम होते व एकाग्रता वाढते. यामुळे स्नायूही शिथिल व सक्षम होतात. नैराश्य दूर करणे व उत्साही राहणे या बाबतीत योग हा कोणत्याही अन्य व्यायाम प्रकारापेक्षा अधिक प्रभावी आहे.

अन्य व्यायामांच्या तुलनेत, योगासने सावकाश केली जातात व ती करताना योग्य श्वसन केले जाते. त्याच वेळी, अतिशय जागरुकतेने शरीराच्या सर्व हालचाली निरखायच्या असतात. अशा प्रकारे, मन निर्मळ केले जाते व ध्यानधारणेचा अनुभव घेतला जातो. वास्तविक, निवांतपणा, उर्जेला योग्य वाट करून देणे व जागरुकता हे योग साधनेचे तीन स्तंभ आहेत.

योग दिवसातून एक किंवा दोन तास करणे पुरेसे नसते. योग ही जीवनपद्धती बनणे गरजेचे आहे. वैद्यकीय आजार असलेल्या व्यक्तीला बरे व्हायचे असेल तर त्या व्यक्तीने औषधे घेणे गरजेचे असते. परंतु, त्या व्यक्तीने योग्य आहार घेणे आणि पुरेशी झोप व विश्रांती घेणेही आवश्यक आहे. अशाच प्रकारे, आपण वैश्विक मूल्यांच्या आधारे, शिस्तबद्ध जीवन जगणेही गरजेचे आहे. योग मनापासून केल्यास, जीवनातील कोणतीही कृती सजगपणे करता येऊ शकते. अशा प्रकारे, आपण विचारांमध्ये व भावनांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. हळूहळू, आपण ध्यानधारणेमध्ये अधिक एकाग्रता साधू शकतो व शेवटी स्वयं-प्रचिती मिळवू शकतो.

योग निरोगी जीवनाचा आणि अंतर्गत व बाह्य शुद्धतेचा संदेश देते. सर्वांप्रति अहिंसा पाळण्याची, तसेच सर्व अडथळ्यांना पार करण्यासाठी एकतेची शिकवण योगद्वारे दिली जाते. या कारणांनी योगा प्रोत्साहन दिल्यास समाजामध्ये प्रेम व एकता वाढीस लागू शकते आणि जगामध्ये शांतता निर्माण होऊ शकते. योगद्वारे मनुष्याला उच्च स्तरावरील शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक स्वास्थ्य मिळो, ही सदिच्छा.