जगभरात ठिकठिकाणी आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. भारतातही जवळपास सर्वच ठिकाणी योग शिबिेरे आयोजित करण्यात आली आहेत. देशाच्या तिन्ही दलांनीही या योग उत्सवाचा ‘सुवर्णयोग’ साधला. नौदलाच्या जहाजांपासून सीमांवरही जवानांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. लडाखमध्ये इंडो-तिबेटन सीमा पोलिसांनी (ITBP) १८ हजार फुटांवर – २५ अंश सेल्सिअस तापमानात योग प्रात्यक्षिके केली. तर नौदलाच्या जवानांनी आयएनएस INS विक्रमादित्य या युद्धनौकेवर योग प्रात्यक्षिके केली.

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आली होती. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यंदा जगभरात ठिकठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरात ५ हजार ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ७४ शहरांमधील कार्यक्रमांमध्ये केंद्रातील ७४ मंत्री सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लखनौमध्ये ५५ हजार लोकांसह योगासने केली. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईकदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते आशिष शेलारही उपस्थित होते. अहमदाबाद येथे योगगुरु रामदेव बाबा यांनी उपस्थितांना योग शिकवला. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी योग केला. मुंबईतील कार्यक्रमात पोलिसांनीही योगासने केली. भोपाळमधील कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही योग केला. तर बंगळुरूमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी योगासने केली. तर नोएडातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी सहभागी झाले होते. चंदीगडमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनीही योगासने केली.