पीटीआय, अयोध्या

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरातील नव्या श्रीराममूर्तीच्या अभिषेकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात येणार आहे. येत्या नवीन वर्षांत मकर संक्रातीच्या पर्वाचे औचित्य साधून या काळात भगवान श्रीरामांच्या मूर्तीच्या अभिषेकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्याचा निर्णय राम मंदिर ट्रस्टने घेतला आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली. ट्रस्ट सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राय यांनी सांगितले, की राम जन्मभूमीवर भगवान श्रीरामांच्या मूर्तीच्या अभिषेकासाठी पंतप्रधान मोदींना उपस्थित राहण्यासंदर्भात विनंती पत्र पाठवण्यात येईल. त्यावर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांचे हस्ताक्षर असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम मंदिराचा तळमजला ऑक्टोबर २०२३ पर्यंत तयार होईल आणि डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीराममूर्तीची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा केली जाण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२४ मध्ये श्रीराममूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मंदिराचे पूजा-आरतीसह धार्मिक विधींसाठी औपचारिक उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या आठवडय़ात अयोध्येत झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत ११ सदस्य उपस्थित होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राय यांनी सांगितले, की मोदींना पाठवण्यात येणाऱ्या पत्रात डिसेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ दरम्यानच्या त्यांना सोयीची तारीख निवडून उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी राय यांनी हेही स्पष्ट केले, की मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराममूर्तीच्या अभिषेकासाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.