सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. अश्विनीकुमार का मरण पावले, हे रहस्य राहू नये. सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांचा मृत्यू का झाला हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे हेच खरे, असे म्हणत शिवसेनेने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सी.बी.आय.च्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्याने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

अश्विनीकुमार हे फक्त सी.बी.आय.चेच संचालक नव्हते तर निवृत्तीनंतर ते नागालॅण्ड आणि मणिपूरचे राज्यपालही होते. ते हिमाचल राज्याचे पोलीस महासंचालक होते. दिल्लीत प्रमुख राजकीय नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवणाऱया एसपीजी गटात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणजे ते मनाने, शरीराने खंबीर होते व त्यामुळेच त्यांच्यावर सरकारने विशेष जबाबदाऱया सोपवल्या. अशी व्यक्ती अचानक आत्महत्या करते व त्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते.

अश्विनीकुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या ‘नटी’ने भाष्य केले पाहिजे. अश्विनीकुमारांना कोणत्या परिस्थितीत आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी विचारायला हवा. सुशांत प्रकरणात आत्महत्या नसून हत्याच आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यांनी जिवाचा आटापिटा केला त्यांना सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येमागे काहीतरी रहस्य आहे, कारस्थान आहे असे वाटू नये, हे गौडबंगाल आहे.

मुंबईत सुशांतने आत्महत्या केली. त्याआधी काही दिवसांपासून तो निराश होता. अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. वृत्तवाहिन्या, भाजपा आय.टी. सेल, त्यांचे पुढारी यांनी सुशांत प्रकरणातील अनेक रहस्ये शोधून धोबीघाटावर आणली. तो रहस्यपट पाहून आफ्रेड हिचकॉक, शेरलॉक होम्स, जेम्स बॉण्डसारखे ‘नायक’ही अचंबित झाले असतील. या सर्व हिचकॉक, शेरलॉक होम्सच्या अवलादींना अश्विनीकुमारांच्या लटकलेल्या देहामागे एखादे रहस्य दडलेले आहे याचा सुगावा लागू नये?

आय.पी.एस. म्हणून त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदे त्यांना मिळाली. मग निराश होऊन गळफास लावून घ्यावा असे त्यांच्या जीवनात काय घडले, यावर प्रकाश पडणे गरजेचे आहे. अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येचे रहस्य यासाठी उलगडायला हवे की, वरिष्ठ पदावर काम करणाऱया अधिकाऱ्यांची मानसिक स्थिती काय आहे? त्यांना कोणत्या दबावाखाली काम करावे लागते? त्यांना असे नैराश्येचे झटके का येतात? त्यांची मानसिक अवस्था बिघडलेली असेल तर ते लोक सैन्य किंवा पोलीस दलाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत काय? अश्विनीकुमार हे पोकळ मनाचे गृहस्थ नव्हतेच. त्यांनी राज्यात व केंद्रात चोख सेवा बजावली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. सुशांत पडद्यावरचा हीरो होता. अश्विनीकुमार हे पोलीस प्रशासनाचे ‘नायक’ होते. हिमाचलच्या एका नटीने सुशांत आत्महत्या प्रकरण लावून धरले. पण त्याच नटीच्या हिमाचलमध्ये सी.बी.आय.च्या माजी संचालकांनी आत्महत्या केली यावर कुणी उसासाही सोडू नये? अश्विनीकुमार का मरण पावले, हे रहस्य राहू नये. शिमल्याचे पोलीस तपास करतीलच. पण सी.बी.आय.चे नेतृत्व केलेल्या अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येने सी.बी.आय.ने तरी पापण्यांची उघडझाप करावी. आपल्या देशात नक्की काय चालले आहे तेच कळायला मार्ग नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ips officer cbi ashwani kumar death saamna editorial shiv sena questioned himachal pradesh kangana ranaut jud
First published on: 09-10-2020 at 08:46 IST