Iran-Israel Conflict : अमेरिकेने तीन अणुकेंद्रांवर केलेल्या माऱ्याचे प्रत्युत्तर म्हणून सोमवारी इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामुळे इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कतारनेही आपल्या भूमिवर झालेल्या हल्ल्याचे उत्तर दिले जाईल, असा इशारा इराणला दिला.

यादरम्यान भारतातील इराणच्या राजदूतांनी मोठं विधान केलं आहे. तेहरानने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या तळांवर केलेले हल्ले अभूतपूर्व होते असे म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांना पु्न्हा अशी कारवाई करण्यास इराण मागेपुढे पाहणार नाही असा इशारा देखील दिली आहे. डॉ. इराड इलाही यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी इराण-इस्रायल संघर्षात अमेरिका मध्ये येईल याची अपेक्षा होती आणि त्यांनी त्यानुसार तयारी केली होती असेही स्पष्ट केले आहे.

इराणचा परखड भाषेत इशारा

“इतिहासात कोणत्याही देशाने अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलेले नाही. इराणाने ते केले. तुम्ही याला प्रतिकात्मक प्रत्युत्तर म्हणू शकता पण जर अमेरिकेने ही बेकायदेशीर कृती पुन्हा केली, तर त्यांना असेच प्रत्युत्तर मिळेल,” असे इराणचे राजदूत म्हणाले आहेत. पुढे बोलताना इलाही यांनी स्पष्ट केले की इराण इस्रायलच्या पुढील कारवाईला निर्णयकपणे उत्तर देण्यासा तयार आहे.

“नेतान्याहू हे विश्वासार्ह नाहीत. त्यांनी इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आणि त्यांनी नागरी भाग, रुग्णवाहिका, रुग्णालये यांना देखील लक्ष्य केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय किंवा मानवतावादी कायद्यांकडे लक्ष दिले नाही. आम्ही इस्रायलच्या कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत,” असे ते म्हणाले

इस्रायलने १३ जून रोजी इराणवर केलेल्या हल्ल्याचे समर्थनात असा दावा केला की ते अण्वस्त्रे तयार करण्याच्या अत्यंत जवळ पोहचला आहे आणि हे त्यांच्या अस्तित्वासाठी असलेला धोका आहे.

यावर बोलताना डॉ. इलाही म्हणाले की, “इराण हा एनपीटीचा सदस्य आहे. इराणकडे कोणते अण्वस्त्रे नाहीत. इस्रायलमधील बेकायदेशीर राजवटीने युरेनियम असल्याचे कारण देऊन इराणवर हल्ला केला. हे हास्यास्पद आहे. इस्त्रायल या प्रदेशातील स्थिरतेवर परिणाम करत आहे.”

दरम्यान दोन्ही देशांमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमूवर इराणने या करारतून स्वतःला मुक्त करण्याची धमकी दिली होती. हा करार अणवस्त्रांचा प्रसार रोखणे आणि अणुउर्जेचा शांततापूर्ण वापरास प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेला इराणचे प्रत्युत्तर

रविवारी अमेरिकेने इराणमधील तीन अणुकेंद्रांवर ‘बंकर बस्टर बॉम्ब’ टाकून तेथे कथितरित्या मोठे नुकसान केले. त्याला प्रत्युत्तर देत इराणने सोमवारी कतारमधील अमेरिकेच्या अल-उदैद तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणी सैन्यदलाने याला दुजोरा दिला असून अमेरिकेने डागलेल्या स्फोटकांइतकीच स्फोटके कतारमध्ये डागण्यात आल्याचा दावाही करण्यात आला.