Iran-Israel Conflict : गेल्या काही दिवासांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. यादरम्यान दक्षिण इस्त्रायलमधील सोरोका मेडिकल सेंटरवर गुरूवारी पहाटे इराणचे क्षेपणास्त्र येऊन आदळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले असून भरपूर नुकसान झाल्याचे इस्त्रायल सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

दरम्यान सोरोका मेडिकल सेंटरवर हल्ल्या केल्याबद्दल इराणकडून मोठी किंमत वसूल केली जाईल असे आश्वासन इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिले आहे.

एएफपीने बचाव अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये किमान ४७ लोक जखमी झाले आहेत. सोरोका मेडिकल सेंटर हे इस्त्रायलच्या दक्षिणेकडील सर्वात मोठे रुग्णालय आहे. इराणनने संपूर्ण इस्त्रायलमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान या रुग्णालयाला देखील लक्ष्य केले आहे.

इस्त्रायली माध्यमांमध्ये या रुग्णालयात नुकसान झाल्याचे अनेक व्हिडीओ चालवले जात आहेत, ज्यामध्ये इमारतीतून काळा धूर बाहेर पडताना दिसत आहे. इतकेच नाही तर हल्ल्यानंतर झालेले नुकसान दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरस होताना दिसत आहेत.

एक व्हिडीओ इस्त्रायलच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये रुग्णालयातील कर्मचारी रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये धुरामधून पळताना दिसत आहेत. तर खिडक्या फुटून जमिनीवर पडलेल्या काचा, तुटलेले बाकडे, खुर्च्या सर्वत्र विखरल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओमध्ये हल्ल्यानंतर कर्मचारी आणि रुग्ण आरडाओरड करताना पाहायला मिळत आहेत.

“इराणी राजवटीने बीरशेबा (Beersheba) येथील सोरोका रुग्णालयाला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने लक्ष्य करत एका प्रमुख मेडिकल सेंटरवर हल्ला केला. आम्ही थांबणार नाहीत. आमच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असेल ते आम्ही करत राहू,” अशी पोस्ट अधिकृत ‘स्टेट ऑफ इस्त्रायल’च्या एक्स अकाउंटवरून केली आहे. हे खाते इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चालवले जाते.

सर्वात मोठे रुग्णालय

सोरोका रुग्णालयाबरोबरच इराणने तेल अवीव येथील उंच इमारतींना देखील क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. तेल अवीव रुग्णालयात १६ जखमींना आणण्यात आले होते, ज्यापैकी तीन जण हे गंभीररित्या जखमी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोरोका रुग्णालय हे १,००० हून अधिक खाटांचे रुग्णालय आहे आणि येथे देशाच्या दक्षिणेकडील जवळपास १० लाख लोकांना उपचार पुरवले जातात, असे वृत्त असोशिएटेड प्रेसने दिले आहे.