Israel Katz On Ayatollah Khamenei: इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सध्या निवाळल्याचं पाहायला मिळत आहे. इस्रायल -इराणच्या संघर्षात अमेरिकेनेही उडी घेतली होती. अमेरिकेने इराणमधील आण्विक तळांवर हल्ला केला होता, त्यानंतर इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला केला होता. दरम्यान, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी घोषणा केली होती. दरम्यान, युद्धबंदीच्या घोषणेनंतर इस्रायल-इराणमध्ये सध्या तरी तणावपूर्ण शांतता आहे.
असं असतानाच आता इस्रायल- इराणबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना रविवारी मोठा इशारा दिला आहे. ‘जर अयातुल्ला अली खोमेनी ज्यू राष्ट्राला धमकावत राहिले तर त्यांचं वैयक्तिक नुकसान होईल’, असं इस्रायल काट्झ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे पुन्हा इस्रायल-इराणमधील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं?
“इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना मी एक स्पष्ट संदेश देऊ इच्छितो. जर तुम्ही इस्रायलला सातत्याने धमकावत राहिलात तर आमचा हात खूप लांब आहे. मग आमचा लांब हात पुन्हा एकदा इराणपर्यंत पोहोचेल. ते देखील आणखी मोठ्या ताकदीने, मग यावेळी तो तुमच्यापर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचेल आणि यामध्ये तुमचं वैयक्तिक नुकसान होईल”, अशा स्पष्ट शब्दांत इस्रायल काट्झ यांनी अयातुल्ला अली खोमेनी यांना इशारा दिला आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
इराणच्या अणू संशोधन मोहिमेचं मोठं नुकसान
इस्रायल-इराण यांच्यातील संघर्षावेळी इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणू संशोधन मोहिमेचं मोठं नुकसान झालं होतं. इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की “आम्ही आमच्या मोहिमेच्या २४ तास आधी इस्फहानवर हल्ला केला. तर, रात्री मुख्य कारवाई पार पाडली. ज्यामुळे आमच्या या मोहीमेची व्यापकता वाढली”. इस्रायली लष्कराने इराणमधील अनेक लष्करी व आण्विक तळांवर हल्ले केले होते. या वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या सेंट्रीफ्यूज उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम झाला होता.
अमेरिकेचे इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हवाई हल्ले
इस्रायल-इराण यांच्यातील संघर्षावेळी अमेरिकेनेही इस्रायल-इराण संघर्षात उडी घेत अमेरिकेच्या वायूदलाने इराणमध्ये हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ व इस्फहानमधील तीन अणू प्रकल्पांना लक्ष्य केलं होतं. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः माहिती देताना सांगितलं होतं की, “आम्ही इराणधील फोर्डो, नतान्झ व इस्फहान मधील अणू प्रकल्पांवर यशस्वी हल्ले केले आहेत. एअर स्ट्राइक करून सर्व लढाऊ विमाने इराणच्या हवाई हद्दीबाहेर आली आहेत. यावेळी फोर्डो येथील अणू प्रकल्पाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे”.