Iran VS Israel War Updates : इस्रायल-इराणमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरांना टार्गेट करत हवाई हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यात दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात विध्वंस होत आहे. असं असतानाच या संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणवर हवाई हल्ले केले. इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करत ते नष्ट केले असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही देशांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देखील अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. मात्र, आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे रशिया दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मंत्री अब्बास अराघची यांच्याकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी पत्र देत पुतिन यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचं वृत्त समोर आलं आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी सोमवारी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांना रशियाला पाठवून व्लादिमीर पुतिन यांना अधिकची मदत मागितल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे. एका वरिष्ठ सूत्राने सांगितलं की, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे खमेनी यांचे पत्र पुतिन यांना देणार आहेत, त्या पत्रात पुतिन यांचा पाठिंबा मागितला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध पुतिन यांनी काही पावलं उचलावे अशी अपेक्षा इराणला आहे. पण तेहरानला कोणती मदत हवी आहे? हे सूत्रांनी स्पष्ट केलेलं नाही. मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावावर इराण आणि रशिया त्यांच्या भूमिकांमध्ये समन्वय साधत आहेत. पुतिन यांनी म्हटलं आहे की, इस्रायलने मॉस्कोला आश्वासन दिलं की इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पात आणखी दोन अणुभट्ट्या बांधण्यास मदत करणाऱ्या रशियन तज्ञांना हवाई हल्ल्यात दुखापत होणार नाही.
दरम्यान, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्लादिमीर पुतिन यांनी निषेध केला असला तरी इराणी ३ अणुकेंद्रावर केलेल्या हल्ल्याबाबत अद्याप ठोस कोणतीही भूमिका रशियाने घेतलेली नाही. त्यामुळे इस्रायल-इराण संघर्षात रशिया सध्या उतरण्याची सार्वजनिकरित्या फारशी इच्छा दाखवत नसल्याचं बोललं जात आहे.
रशिया इराणला मदत का करत नाही? पुतिन म्हणाले, “इतिहासात…”
रशियाचे मध्य पूर्वेतील मित्र राष्ट्रांशी चांगले संबंध असल्याचं पुतिन यांनी म्हटलं. सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचाच्या एका सत्रात बोलताना पुतिन म्हणाले की, “मी तुमचं लक्ष वस्तुस्थितीकडे वेधू इच्छितो. सोव्हिएत युनियन आणि रशियन फेडरेशनमधील सुमारे २० लाख लोक इस्रायलमध्ये राहतात. आज हा जवळजवळ रशियन भाषिक देश आहे आणि रशियाच्या इतिहासात आम्ही हे नेहमीच लक्षात घेतो”, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.
“अरब राष्ट्र आणि इस्लामिक देशांशी रशियाचे दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. रशियाच्या लोकसंख्येपैकी १५ टक्के लोक मुस्लिम आहेत. रशिया हा ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये (OIC) देखील प्रतिनिधित्व करत होता. रशियाने गेल्या अनेक दशकांपासून मध्य पूर्वेत एक संतुलन राखलं आहे. मॉस्कोचे इस्रायलशी चांगले संबंध आहेत आणि इराणबरोबरही मजबूत आर्थिक आणि लष्करी संबंध विकसित केले आहेत, त्यामुळे रशियाचे इराणशी देखील विश्वासार्ह संबंध आहेत. रशियाने बुशेहर व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यास मदत केलेली आहे”, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.