इराकच्या पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न; मुस्तफा अल-कादिमींच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला

इराकी लष्कराने हा पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

Iraq prime minister Mustafa al kadhimi drone attack at his residence
(फोटो सौजन्य -reuters)

इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला. रविवारी सकाळी हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इराकचे पंतप्रधान या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. इराकी लष्कराने हा पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मात्र, अल अरेबियाच्या वृत्तानुसार या हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत.

इराकी लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यामध्ये कादिमींच्या बगदाद येथील निवासस्थानाच्या ग्रीन झोनला लक्ष्य करण्यात आले. मात्र, यावेळी लष्कराकडून कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यात आलेली नाही.

अन्य दोन सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कादिमी यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला केला. दोघांनीही वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की पंतप्रधान कादिमी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्याचबरोबर कदिमी यांनी हल्ल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बगदादमधील पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या ग्रीन झोन परिसरात सरकारी इमारती आणि परदेशी दूतावास आहेत. येथे राहणाऱ्या पाश्चात्य राजदूतांनी सांगितले की त्यांनी स्फोटांचा आणि गोळीबाराचा आवाज ऐकला. याआधी शनिवारी, इराण समर्थक हशेद अल-शाबी शिया मिलिशिया समर्थकांनी ग्रीन झोनमधील एका गेटबाहेर तळ ठोकला आणि गेल्या महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालांचा निषेध केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Iraq prime minister mustafa al kadhimi drone attack at his residence abn

ताज्या बातम्या