Donald Trump : भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये टॅरिफच्या मुद्यावरून काही प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लादलेलं आहे. त्यामुळे याचा फटका भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतरही भारताने अमेरिकेचा दबाव झुगारून लावलेला आहे.
एकीकडे भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे चीन-आणि भारतामधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या दौऱ्यात असताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीनंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांनी आगपाखड व्यक्त केल्याचं दिसून येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियावर सोमवारी एक पोस्ट करत पुन्हा एकदा भारतावर टीका केली. तसेच अमेरिकेच्या वस्तूंवरील आयातशुल्क शून्यावर आणण्याची भारताने तयारी दाखवली असल्याचा मोठा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेमधील व्यापार समीकरणाला एकतर्फी आपत्ती असं म्हटलं. तसेच भारताने अमेरिकन वस्तूंवरील आयात कर कमी करण्याची ऑफर दिली आहे. मात्र, आता त्यासाठी खूप उशीर झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, “काही लोकांना हे समजतं की आम्ही भारताबरोबर खूप कमी व्यवसाय करतो. मात्र, ते आमच्याबरोबर मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात. कारण भारताने आतापर्यंत आमच्यावर (अमेरिका) मोठ्या प्रमाणात शुल्क आकारलं. त्यामुळे आमच्या अतिशय कमी वस्तू तिथे विकल्या जातात. त्यामुळे हा एकतर्फी व्यापार संबंध असून अनेक दशकांपासून हे सुरू आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
‘आता खूप उशीर झाला…’
भारताने अमेरिकेवर शून्य आयातशुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला होता. पण हे पाऊल खूप आधीच उचलायला हवे होते, असेही ट्रम्प म्हणाले. “ते आता आयातशुल्क काढून टाकण्यासंदर्भात प्रस्ताव देत आहेत. पण यासाठी आता खूप उशीर झाला आहे. हे खूप वर्षांआधीच व्हायला हवे होते”, असे ते म्हणाले.
