Mental Cruelty Divorce In India: छत्तीसगड उच्च न्यायालयाने पत्नीने पती बेरोजगार आहे म्हणून त्याची थट्टा करणे किंवा त्याला टोमणे मारणे ही मानसिक क्रूरता आहे, असे म्हटले आहे. एका घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने ५२ वर्षीय पुरूषाचा घटस्फोट मंजूर केला.

न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती अमितेंद्र किशोर प्रसाद यांच्या दोन सदस्सीय खंडपीठांनी निकाल देताना म्हटले आहे की, “पती-पत्नींचे वर्तन, ज्यामध्ये शाब्दिक वाद आणि अवास्तव मागण्यांचा समावेश आहे, ते मानसिक क्रूरता निर्माण करू शकतात, ज्यामुळे घटस्फोटाचा आदेश लागू होतो.” याबाबत लाईव्ह लॉ ने वृत्त दिले आहे.

अनिल कुमार सोनमणी यांनी यापूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, परंतु कनिष्ठ कौटुंबिक न्यायालयाने तो फेटाळला. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांचे अपील स्वीकारले आणि पूर्वीचा निर्णय रद्द करत त्यांना घटस्फोट मंजूर केला.

या जोडप्याचे १९९६ मध्ये भिलाई येथे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सोनमणी यांच्या पत्नीने पीएचडी पदवी मिळवल्यानंतर आणि शाळेत प्राचार्य म्हणून नोकरी मिळाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचे न्यायालयात सुनावणीवेळी सांगण्यात आले होते.

पेशाने वकील असलेले सोनमणी म्हणाले की, कोविड-१९ महामारीच्या काळात, जेव्हा न्यायालये बंद होती, तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना वारंवार टोमणे मारले, अपमानित केले, अवास्तव मागण्या केल्या आणि त्यांना बेरोजगारही म्हटले.

खंडपीठाने म्हटले की, “पीएचडी पदवी मिळवल्यानंतर आणि प्राचार्य म्हणून उच्च पगाराची नोकरी मिळवल्यानंतर, प्रतिवादीचे अपीलकर्त्याशी वागणे लक्षणीयरीत्या बदलले हे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे.”

“पत्नी पतीचा अनादर करत होती, कोविड काळात बेरोजगार असल्याबद्दल वारंवार टोमणे मारत होती आणि क्षुल्लक गोष्टींवरून वारंवार शाब्दिक वाद घालत होती. कायद्यानुसार ही कृत्ये मानसिक क्रूरतेसारखी आहेत”, असे न्यायालयाने पुढे म्हटले आहे.

२०२० मध्ये पत्नी त्यांच्या १६ वर्षांच्या मुलाला सोडून १९ वर्षांच्या मुलीसह घराबाहेर पडली. त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे सोनमणी यांनी सांगितले. पुढे पत्नीने भिलाई पोलीस ठाण्यात एक पत्र सादर केले होते. त्यामध्ये म्हटले होते की, ती तिचे पती आणि मुलाशी असलेले सर्व संबंध तोडत आहे.