सकल राष्ट्रीय उत्पादनाचे (जीडीपी) एप्रिल ते जून या तिमाहीचे सोमवारी जाहीर होणारे आकडे भारताची वाटचाल मंदीकडे सुरू असल्याचे निदर्शक ठरण्याची शक्यता आहे. सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपी आक्रसला आहे. हीच परिस्थिती जुलै – सप्टेंबर या तिमाहीतही कायम राहण्याची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवरी लागोपाठचे टाळेबंदीचे टप्पे आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव यांचा जोरदार फटका बसल्याने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यांत आर्थिक व्यवहारांना फार मोठय़ा प्रमाणावर खीळ बसली. त्यामुळे पहिल्या तिमाहीसाठी ‘जीडीपी’ सरासरी २० टक्के आक्रसत असल्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. एप्रिल ते जून या कालावधीसाठीची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) सोमवारी जाहीर करणार आहे. भारताने १९९६ साली तिमाही आकडेवारी जाहीर करण्यास सुरुवात केल्यापासूनचे हे सर्वात धक्कादायक आकडे असू शकतात. जगातील सर्वात मोठय़ा २० अर्थव्यवस्थांपैकी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत, जूनला संपलेल्या तिमाहीत सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली. आर्थिक वाढीत २१.७ टक्क्य़ांची वार्षिक घट हे त्या देशातील सर्वात मोठय़ा मंदीचे निदर्शक आहे.

तथापि, संघटित क्षेत्रांपेक्षा लघुउद्योग क्षेत्र आणि अनौपचारिक क्षेत्र यांना अधिक फटका बसल्याचे लक्षात घेता, या आकडय़ांमधून आर्थिक संकटाचे खरे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अतिशय कमी गुंतवणूक, भांडवली खर्च आणि उपभोग्य मागणी यांचा उत्पादन, बांधकाम, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फटका बसला आहे. त्याचवेळी, एप्रिल- जून या तिमाहीत कृषी क्षेत्रातील वाढ ३-४ टक्क्य़ांदरम्यान असल्याचे आढळले आहे. राज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये टाळेबंदी जाहीर केल्याने, दुसऱ्या तिमाहीत वसुलीचे प्रमाणही अपेक्षेनुसार वाढलेले नाही.