इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने कोणत्याही निधीचा गैरवापर केला नसल्याचा दावा वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकने केला आहे. त्याचबरोबर दहशतवादी कृत्यात सामील असल्याचा आरोपही फेटाळला आहे. मी अनेकवेळा राष्ट्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास तयार झालो होतो, असेही त्याने म्हटले आहे. मी जर हिंसेचे समर्थन केले असते तर मुसलमान राहिलो नसतो, असेही नाईकने म्हटले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला इ-मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत नाईकने आपली बाजू मांडली. मिळालेल्या निधीच्या प्रत्येक रूपयांचा माझ्याकडे हिशेब आहे, असा दावाही नाईकने केला.

काही दहशतवादी माझ्या भाषणामुळे प्रभावित झाले हा माझ्यावरील आरोप चुकीचा आहे. जर मी खरच दहशतवादाला प्रोत्साहन देत राहिलो असतो तर आतापर्यंत लाखो दहशतवादी बनले नसते काय, असा दावाही नाईकने केला. माझ्या लाखो समर्थकांमध्ये काही समाजविघातक लोक असू शकतात. जर कोणी हिंसेचा मार्ग अवलंबत असेल तर तो मुसलमान नाही आणि त्याला माझे समर्थनही नसेल, असे त्याने म्हटले.
मुंबई आणि दिल्लीतील संघटनेचे कार्यकर्ते इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवरील बंदीविरोधात पाऊल उचलण्यासाठी कायदेशीर पर्याय पाहत असल्याचे सांगत आपण लवकरच न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बेकायदा कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. यापूर्वी स्वंयसेवी संस्थांना थेट विदेशी निधी मिळत होता. गृह मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विदेशी निधी घेण्यापूर्वी परवानगीची अट घातली होती. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला विदेशातून मिळणाऱ्या निधीच्या चौकशीचेही आदेश दिले होते.
तरुणांना दहशतवादाकडे वळविण्यासाठी त्यांचे ब्रेन वॉश केल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्याने आपण झाकीर नाईकच्या भाषणांना प्रेरित झाल्याचे म्हटले होते. तेव्हापासून झाकीर नाईक वादाच्या भोवऱयात सापडला आहे. पीस टेलिव्हिजनचाही झाकीर नाईकच्या संस्थेशी संबंध असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.